पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी रविवारी (दि. ५) संपणार असल्याने उमेदवारांसाठी नेत्यांच्या सभांमुळे प्रचाराचा धुरळा उडला आहे. सभांमध्ये उमेदवारासह पक्षाच्या नेत्यांवर स्तुतीसुमने उधळली जातात. अशाच एका प्रचार सभेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. मात्र कौतुक करताना जानकर यांच्याकडून शब्दांची गल्लत झाली.
महादेव जानकर महायुतीचे उमेदवार म्हणून परभणीतून लोकसभेच्या रिंगणात आहेत. महायुतीत आल्यानंतर ते राज्यभर महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. महायुतीच्या एका प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करताना महादेव जानकर चुकले. सभेतील भाषणावेळी अजित पवार यांचा 'भाबडा माणूस' असा उल्लेख करताना त्यांच्याकडून 'भामटा' असा उल्लेख अनावधानाने झाला. ते अजित पवार यांचे कौतुक करत होते, त्याचवेळी शब्दांची गल्लत झाली, 'अजितदादा भाबडा माणूस, मनाने मोकळा असलेला माणूस' असं त्यांना म्हणायच होतं पण त्याऐवजी अनावधानाने ते 'भामटा' असे म्हणाले.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महादेव जानकर आज (दि.४) बारामतीत आहेत. अजित पवार आणि महादेव जानकर यांच्या उपस्थितीत बारामतीत सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पुर्वी, सुनेत्रा पवार यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. "बारामती हे माझ माहेर घर आहे. माझी राष्ट्रीय नेता ही ओळख बारामती मतदारसंघाने केली आहे. दिल्लीमध्ये राजा राहतो, मुंबईमध्ये सुभेदार राहतो. दिल्लीतील लाल किल्ल्यातून जास्त फंड आणला तर येथील अजून विकास होईल. अजित पवार यांची प्रशासनावर चांगली पकड आहे," असेही जानकर यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Elections 2024)
हेही वाचा :