Latest

Quinton De Kock : क्विंटन डी कॉकने रचला इतिहास, डिव्हिलियर्सचा ‘हा’ विक्रम मोडला

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेचा तुफानी फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. मंगळवारी लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी)कडून खेळताना त्याने टी-20 क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम नोंदवला. डी कॉकने लखनऊच्या एकना स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध 12 धावा करताच टी-20 कारकिर्दीतील 9 हजार धावा पूर्ण केल्या. यासह त्याने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले.

Quinton De Kock ठरला जगातील सहावा फलंदाज

डी कॉकने टी-20 कारकिर्दीतील 307 सामन्यांच्या 298 व्या डावात 9000 धावांचा टप्पा पार केला. याचबरोबर त्याने एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला. एबीडीने 323 सामन्यांच्या 304 डावांमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. डिव्हिलियर्सचा विक्रम मोडत डी कॉक सर्वात जलद 9,000 धावा पूर्ण करणारा जगातील सहावा खेळाडू ठरला. त्याने शिखर धवन (308 डाव), मार्टिन गप्टिल (323), फाफ डू प्लेसिस (317), जोस बटलर (318) यांच्यासह अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकले.

बाबर आझमच्या नावावर विक्रम

टी-20 कारकिर्दीतील सर्वात जलद 9 हजार धावांचा विक्रम पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहे. त्याने 254 सामन्यांच्या 245 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. ख्रिस गेल 259, विराट कोहली 271, डेव्हिड वॉर्नर 273 आणि अॅरॉन फिंच यांनी 281 डावात 9 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. फिंचनंतर आता डी कॉकच्या (Quinton De Kock)नावाची नोंद झाली आहे.

मंगळवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात कठीण खेळपट्टीवर डी कॉकला फक्त दोन षटकार मारता आले. त्याने 15 चेंडूत एकूण 16 धावा केल्या. पीयूष चावलाने डी कॉकला इशान किशनकरवी झेलबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.