Latest

Congress : लोकसभेसाठी काँग्रेसचे ‘एकला चलो रे’ ?; ४८ मतदारसंघात इच्छुकांची चाचपणी

अविनाश सुतार


नागपूर : अलिकडेच नागपुरात है तय्यार हम…काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिन रॅलीच्या निमित्ताने निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणाऱ्या काँग्रेसने, भारत जोडो न्याय यात्रेच्या घोषणेसोबतच भाजपविरोधात एकला चलो रे…धक्कातंत्र अवलंबिल्याचे दिसत आहे.आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत अधिक जागा मिळविण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. अशातच आता काँग्रेसने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघासाठी इच्छुकांची नावे मागितल्याने मविआत बिघाडी तर होणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. Congress

गुरुवारी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. वासनिक यांचे खंदे समर्थक मूळ नागपूरचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांना संघटन व प्रशासन अशी महत्त्वाची जबाबदारी प्रदेश कार्यालयात देण्यात आलेली आहे. Congress

एकीकडे हा पटोले गटासाठी धक्का असला तरी वासनिक आणि प्रदेश काँग्रेस यांच्यात सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीतील बैठकीनंतर राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची नावे येत्या १० जानेवारीपर्यंत प्रदेश काँग्रेसकडे पाठवायचे आदेश देण्यात आले आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघ हा सातत्याने काँग्रेसकडे राहिला असल्याने आम्हाला कुठलीही अडचण नाही. आमच्याकडे इच्छुकांची काही नावे आजच तयार आहेत. आणखी काही नावे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून चर्चा करून प्रदेश काँग्रेस व हाय कमांडकडे पाठविणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात रामटेक व नागपूर या दोन लोकसभा मतदारसंघ येतात. रामटेक संदर्भात इच्छुकांची नावे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक हे पाठविणार आहेत. मविआचा विचार करता गेल्या वेळी हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे होता. मात्र, आता विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटात असल्याने या मतदारसंघात ठाकरे गट काँग्रेस की राष्ट्रवादी लढणार याचा फैसला भविष्यात होणार आहे. मात्र, काँग्रेसकडून गेल्या वेळी नागपुरात लढलेले नाना पटोले यावेळी पुन्हा एकदा लढतात की विधानसभा मतदारसंघातच आपले नशीब आजमावतात याचाही निर्णय लवकरच होणार आहे.

Congress  : ४८  मतदारसंघात इच्छुकांची नावे मागितल्याने स्वबळाची तयारी

एकीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून ओढाताण सुरू असतानाच आता काँग्रेसने थेट सर्व मतदार संघात इच्छुकांची नावे मागितल्याने ही स्वबळाची तयारी की अधिकाधिक जागा पदरी पाडण्याच्या दृष्टीने दबाव तंत्र याविषयीची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. यापूर्वीच्या चर्चेत शिवसेनेत ठाकरे गटाने सर्वाधिक जागांवर दावा केला. यानंतर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडी असे काहीसे संमिश्र जागावाटप बाहेर आले. मात्र, जागा वाटपाच्या दृष्टीने अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही आमच्या तयारीला लागलो आहेत. भाजपविरोधात लढण्यासाठी जे- जे सोबत येतील ते आमच्या सोबत राहतील, असा विश्वास काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखविला. एकास एक उमेदवार देण्याच्या प्रयत्नांचा हा भाग म्हणता येईल.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT