नाशिक; पुढारी ऑनलाईन : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या जागेसाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा बुधवारी (दि.१) करण्यात आली. त्यामुळे हेमंत गोडसे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. (Nashik Lok Sabha Hemant Godse)
महायुतीकडून भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीनही पक्षांकडून या जागेवर दावा करण्यात येत होता. मात्र गोंडसेंनी अनेकांना धक्का देत उमेदवारीचा गड राखला. छगन भुजबळ व हेमंत गोडसे दोन नावांची चर्चा सुरू असताना नाव जाहीर करण्यास होणारा विलंब पाहता भुजबळांनी माघार घेतली. त्यानंतर गोडसेंचा मार्ग मोकळा झाला. अखेर आज गोडसे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. हेमंत गोडसे यांना पुन्हा संधी देण्यात आली असून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. गोडसे हे चौथ्यांदा नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
तर, महाविकास आघाडीकडून या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे अशी प्रमुख लढत नाशिकमध्ये होणार आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील असे श्रीकांत शिंदे यांनी घोषित केले होते. त्यानंतर महायुतीतील उर्वरित दोनही पक्षातून गोडसे यांच्या नावाला विरोध झाला. भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) दोनही पक्षांनी या जागेवर दावा केला होता. त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. (Nashik Lok Sabha Hemant Godse)
हे ही वाचा :