Latest

माझ्या पराभवासाठी जिल्ह्यातील काही नेत्यांची रसद : आमदार विक्रम सावंत

backup backup

"जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार जगताप यांनी उसना उमेदवार घेऊन भाजपकडून त्यांना उमेदवारी दिली. भाजप पुरस्कृत पॅनेल विजयी झालेले जमदाडे आणि काहींनी मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोड केल्याने त्यांचा विजय झाला आहे. तरी जमदाडे यांनी विजयाने हरळून जाऊ नये. माझ्या पराभवासाठी जिल्ह्यातील काही नेत्यांची रसद होती; परंतु जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. या माध्यमातून शेतकरी हा केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे", अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी जत येथील पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा बँकेचे नूतन संचालक प्रकाश जमदाडे यांच्यावर आमदार सावंत यांनी जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, कार्याध्यक्ष नाना शिंदे, रवींद्र सावंत, अभिजित चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, महादेव पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक भूपेंद्र कांबळे, नाथा पाटील, गटनेते साहेबराव कोळी, युवराज निकम,माजी नगरसेवक निलेश बामणे, दिपक अंकलगी, मारुती पवार,रावसाहेब मंगसुळी, काका शिंदे, प्रवीण तोडकर, परशुराम मोरे, माजी सभापती बाबासाहेब कोडग, अभिजीत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, इराणा निडोनी, भीमगौंडा पाटील आदी उपस्थित होते.

आमदार सावंत म्हणाले, "जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. हा विजय महाविकास आघाडीच्या एकीच्या श्रेयाचा विजय आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाच वर्ष कारभार पारदर्शक केला. तालुक्यातील अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेती व इतर कर्जे मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या मात्र कोणत्याही कर्मचाऱ्यांची गैरसोय कधीही केली नाही. याउलट माजी आमदार विलासराव जगताप हे बँकेचे संचालक असताना एका वर्षात अनेक कर्मचाऱ्यांच्या त्यांनी बदल्या केल्या. बदल्यातून राजकारण करण्याचे काम त्यांनी केले आहे. गेल्या पाच वर्षात माजी आमदारांनी जेवढी विकास कामे केले नाहीत, ती कामे मी दोन वर्षात केली आहेत. तालुक्यातील पाणीप्रश्नासाठी सातत्याने लढा देत आहे."

सावंत म्हणाले, माजी आमदारांचे सुपुत्र पंचायत समितीचे सभापती म्हणून कार्यरत आहेत. कोरोनाच्या काळात ते कुठे गायब होते? ज्या पंचायत समितीत सर्वसामान्य लोकांची कामे करण्याचे ठिकाण असताना सभापती काय करतात?. याबाबत माजी आमदार जगताप यांनी आत्मचिंतन करावे, अशी टीका आमदार सावंत यांनी करत घमेंडीची भाषा आम्ही कधीही केली नसून एका विजयाने जमदाडे यांचा तोल सुटल्याचा आरोपही त्‍यांनी केला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार म्हणाले की, "झालेला पराभव आम्हाला मान्य आहे. आमदार सावंत यांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्यामुळे त्यांचा पराभव झाला. तरीही यापुढील काळात येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष ताकदीने उतरणार आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT