मुंबई : पुढारी वृत्तसेवा राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ठरवून 'गेम' केला असल्याची भावना झालेल्या शिवसेनेने आता 'बदला'ची भाषा करत विधान परिषद निवडणुकीवेळी आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा दिला आहे. शिवसेनेच्या या गर्भित इशार्यामुळे काँग्रेसचे दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पराभवाचे विश्लेषण आणि त्यामागील नेमकी कारणे शोधण्यासाठी शनिवारी रात्री उशिरा शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने आपली दोन मते संजय पवार यांना दिली नसल्याचे अनेक नेत्यांनी उघडकीस आणले; तर शिवसेनेच्या उमेदवाराच्या विजयासाठी तजवीज न करता शरद पवार
यांनी पटेल यांच्यासाठी आणखी एका जादा मताची सोय केल्यामुळे शिवसेना नेते रागावले आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने 20 जून रोजी होणार्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपऐवजी आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच लक्ष्य करण्यासाठी रणनीती आखली असल्याचे समजते.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा शिवसेनेचा आग्रह असताना या निवडणुकीच्या रणधुमाळीतच काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या रविवारी झालेल्या बैठकीत या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर आहे. त्यामुळे राज्यसभेच्या पराभवामुळे आधीच नाराज झालेल्या शिवसेनेच्या जखमेवर काँग्रेसने मीठ चोळल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता ठिणगी पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
राज्यसभा निवडणुकीतील आपल्या दुसर्या क्रमांकाचे उमेदवार संजय पवार यांच्या विजयाचे शिवसेनेने गणित जुळवले होते. पण काँग्रेसने त्यांची उरलेली दोन मते शिवसेनेच्या उमेदवाराला दिली नाहीत. मतफुटीच्या भीतीने काँग्रेसने आपली सर्वच्या सर्व 44 मते आपल्याच उमेदवाराला टाकली. हे जगजाहीर असताना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आम्हाला अधिकची दोन मते कोणाची मिळालीत, हे आम्ही तपासत असल्याचे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना मिळालेले अधिकचे एक मत आघाडीतील नसून पटेल यांनी अन्य एकाचे मत मिळविले आहे, असे बोलून शिवसेनेच्या संभ्रमात आणखी भर टाकली आहे. निवडणुकीनंतर मित्रपक्षांकडूनच असे खुलासे होऊ लागल्यामुळे शिवसेना संतापली आहे.
काँग्रेस अडचणीत
विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडे 54 आणि काही अपक्षांची बेगमी आहे. त्यानुसार सचिन अहिर आणि नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी विजयी होऊ शकतील. राष्ट्रवादीकडे 53 आणि काही अपेक्षांचं बळ आहे. त्यावर या पक्षाचे रामराजे निंबाळकर व एकनाथ खडसे विजयी होतील. काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. यावर भाई जगताप विजयी होतील. त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मते शिल्लक राहात असून चंद्रकांत हंडोरे यांच्यासाठी त्यांना 12 मतांची तजवीज करावी लागणार आहे. अपक्षांच्या माध्यमातून शिवसेनेकडे जादा मतांचा आकडा आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने आपली उर्वरित दोन मते दिली असती तर जादाची मते हंडोरे यांच्याकडे वळली असती. याच बळावर शिवसेना आता काँग्रेसवरील आपला वचपा काढणार असल्याचे बोलले जात आहे.
मतांच्या गणितावर भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतील. पण सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविल्यामुळे राज्यसभेप्रमाणे भाजपने महाविकास आघाडीतील धाकधुक आणखी वाढवली आहे.
मिलिंद नार्वेकर – अनिल परब यांच्यात शाब्दिक चकमक
कालच्या बैठकीमध्ये शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्यात खडाजंगी झाल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपक्षांची बैठक घेतल्यानंतर राज्यसभेचे उमेदवार संजय पवार यांच्या विजयासाठी अपक्ष आमदारांच्या आकड्यांची जुळवाजुळव करणे, अपक्षांना संपर्कात ठेवणे आदी जबाबदार्या अनिल परब यांच्यावर सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या नीट पार पाडल्या नसल्याचा आरोप नार्वेकर यांनी या बैठकीत केला. त्यावर त्याला परब यांनी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले. कुठेच कसर ठेवली नाही, असा दावा केला. त्यानंतर शब्दाला शब्द वाढत जाऊन या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे समजते. अर्थात या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये, असे शिवसेनेच्या नेत्यांना बजावण्यात आले होते.
हे ही वाचलंत का?