Latest

Lalit Patil drug Case : ललित पाटील लवकरच पुणे पोलिसांच्या ताब्यात

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात ड्रगमाफिया ललित पाटील याची सोमवारी मुंबई येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर पुणे पोलिसांनी ललितला अटक करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाकडून ताबा घेण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ललितला पुणे पोलिसांकडून कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊन अटक होण्याची शक्यता आहे. महिनाभरापूर्वी पुणे पोलिसांनी ससून गेटवरून तब्बल 2 कोटी 14 लाखांचे ड्रग पकडले होते. याप्रकरणी सुभाष मंडल आणि रौफ शेख यांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडील तपासात या ड्रगच्या व्यवहारातील मास्टर माइंड हा ललित असल्याचे निष्पन्न झाले होते.

तो ससून रुग्णालयात राहून हे ड्रगचे रॅकेट चालवत होता. याच धर्तीवर अटक होण्याच्या भीतीने तो ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला पळून जाण्यास त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक मंडल, त्याची मैत्रीण प्रज्ञा कांबळे, रोझरी स्कूलचा विनय अर्‍हाना, त्याचा चालक डोके यांनी मदत केली होती. पुढे या प्रकरणात भूषण पाटील व बलकवडेला नेपाळ बॉर्डरवरून अटक झाली.

त्याच वेळी दुसरीकडे ललित साकीनाका पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई तसेच इतर ठिकाणचे धागेदोरे धुंडाळले. सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्याचा ताबा मिळावा, यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई येथील न्यायालयात अर्ज केला होता. दरम्यान, त्याचा ताबा घेण्यास पुणे पोलिसांना कायदेशीर परवानगी मिळाली आहे. त्याला कोणत्याही क्षणी ताब्यात घेऊन अटक होण्याची शक्यता आहे.

पुण्यात झालेल्या ड्रग तस्करीच्या हालचाली, त्यानुषंगाने ससूनच्या गेटवर पकडलेले ड्रग, याचा एक गुन्हा दाखल झाला होता; तर दुसरा गुन्हा ललित पाटील पळून गेल्याप्रकरणी दाखल झाला होता. या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे. ललित पाटील याचा ताबा मिळाल्यानंतर पुणे पोलिस ललितला नेमके कोणत्या गुन्ह्यात अटक करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत 28 दिवसांची पोलिस कोठडी घेण्याची संधी मिळणार आहे. मात्र, त्यासाठी पोलिसांकडून न्यायालयाला तपासातील प्रगती दाखवावी लागेल.

यापूर्वी अटक केलेल्यांची समोरासमोर चौकशी

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली ललितची मैत्रीण प्रज्ञा कांबळे, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अर्‍हाना यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची पुणे पोलिसांनी न्यायालयीन कोठडी घेतली आहे. त्यामुळे ललितला अटक झाल्यानंतर ज्यांचे ज्यांचे पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे, त्यांना पुन्हा समोरासमोर चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांच्या तपासात ललितकडून मोठे धागेदोरे देखील हाती लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT