Latest

Rajya Sabha election : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदाराला दणका, पक्षातून केले निलंबित

दीपक दि. भांदिगरे

चंदीगड; पुढारी ऑनलाईन

४ राज्यांतील राज्यसभेच्या (Rajya Sabha polls) १६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीचा हरियाणातील निकाल धक्कादायक लागला. येथे काँग्रेसला तगडा झटका बसला आहे. काँग्रेसला हा झटका काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अगदी जवळचे मानले जाणारे कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांनी दिला आहे. त्यांची बंडखोरी काँग्रेसला महागात पडली आहे. यामुळे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अजय माकन यांचा पराभव झाला. तर भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शमा विजयी झाले आहेत.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणी काँग्रेसने कुलदीप बिश्नोई यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना पक्षाच्या सर्व पदावरुन निलंबित करण्यात आले आहे. तसेच बिश्नोई यांना काँग्रेस कार्यकारी समितीच्या (CWC) सदस्यपदावरुन हटवण्यात येणार आहे. त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द व्हावे, यासाठी सभापतींना पत्रही लिहिले जाणार असल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले. कुलदीप बिश्नोई हरियाणाच्या हिसारमधील आदमपूरमधून चौथ्यांदा प्रतिनिधित्व करत आहेत.

निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृष्ण लाल पनवार यांना ३६ मते मिळाली, तर कार्तिकेय शर्मा यांना पहिल्या पसंतीची २३ मते मिळाली आणि ६.६ मते भाजपकडून मिळाली. त्यांची मतसंख्या २९.६ झाली. दुसरीकडे माकन यांना २९ मते मिळाली. पण दुसऱ्या पसंतीची मते न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.

राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक आमदाराच्या मताचे मुल्य १०० एवढे असते. हरियाणातील ९० आमदारांपैकी अपक्ष उमेदवार बलराज कुंडू यांनी मतदान केले नाही. तर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे एक मत रद्द केले. यामुळे ८८ मते शिल्लक राहिली होती. दरम्यान, दुसऱ्या जागेवर भाजपचे कृष्णलाल पंवार विजयी झाले. त्यांच्या विजयानंतर ६६ मते शिल्लक होती. ती मते कार्तिकेय यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली. कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना २९-२९ मते मिळाली होती. पण भाजपकडून मिळालेल्या मतानंतर त्यांचा विजय झाला. क्रॉस व्होटिंग आणि काँग्रेसचे एक मत अवैध ठरवल्याने संपूर्ण चित्र बदलून गेले.

 हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT