पुढारी ऑनलाईन डेस्क: 'मम्मी, पप्पा…मला JEE शक्य नाही, मी करू शकत नाही, असे पत्र लिहित एका तरुणीने जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना कोटा येथे घडली आहे. कोटा येथे या वर्षातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मंगळवार २३ जानेवारीला खासगी कोचिंगद्वारे NEET ची तयारी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले हाेते, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Kota News)
जीवन संपवलेल्या तरुणीचे नाव निहारिका असे आहे. ती जेईई मेनची तयारी करत होती. तिने कोटा येथील शिक्षा नगरी भागातील तिच्या घरातील खोलीत गळफास लावून जीवन संपवले. तिची परीक्षा ३१ जानेवारीला होणार होती. मात्र परीक्षेच्या आधी दोन दिवस तिने हे टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी जप्त केलेल्या सुसाईड नोटमध्ये, निहारिकाने स्वतःला "सर्वात वाईट मुलगी" म्हणून संबोधले आणि तो "तिचा शेवटचा पर्याय" असल्याचे म्हटले आहे.
इंजिनिअर आणि डॉक्टर बनण्याच्या इच्छेखातर उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह देशभरातून हजाराे विद्यार्थी राजस्थानच्या कोटा येथे मोठ्या आशेने येतात. येथे नीट, आयआयटी आणि इतर परीक्षांची तयारी करू लागतात. काही कालावधी गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमी येते. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. (Kota News)
स्पर्धा तीव्र असते आणि अनेक विद्यार्थ्यांची तेवढी क्षमताही नसते. अशावेळी आपण पालकांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकत नसल्याचा अपराधभाव काही मुलांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यातूनच या शहरात सातत्याने विद्यार्थ्यी जीवन संपवत आहेत. यावर्षी आतापर्यंत 23 विद्यार्थ्यांनी जीवन संपवले. त्यापैकी एक विद्यार्थी महाराष्ट्रातील लातूरचा होता. 2015 मध्ये सतरा, 2016 मध्ये सोळा, 2017 मध्ये सात, 2018 मध्ये वीस, 2019 मध्ये आठ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. 2022 मध्ये पुन्हा 15 विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवली. तर 2023 मध्ये जवळपास 28 विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे. (Kota News)
राजस्थानातील कोटा हे चंबळ नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये खासगी शिकवणी वर्गांचे देशातील प्रमुख केंद्र म्हणून या शहराचा लौकिक झाला आहे. सुमारे दोनशेहून अधिक खासगी शिकवणी वर्ग इथे आहेत. देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून देशभरातले हजारो विद्यार्थी तेथे जातात.