Latest

Kolhapur Tourism Story : ‘त्‍यांचे’ शब्‍दच जिवंत करतात काेल्‍हापूरची सृष्‍टी…. जाणून घ्‍या दृष्‍टीबाधित टुरिस्ट गाईडविषयी

सोनाली जाधव

 तुमच्याकडे जिद्द आणि जगण्याची उमेद असेल तर तुम्ही काेणत्‍याही संकटावर  मात करु शकता. हेच आपल्या कामातून सांगत आहेत सरीता, सचिन, आशा आणि अक्षय. चौघेही दृष्टीबाधित आहेत. सध्या जिल्हा पर्यटन माहिती केंद्र, कोल्हापूर येथे टुरिस्ट गाईड (पर्यटक मार्गदर्शक) म्हणून काम करत आहेत. ते सांगतात, " आम्ही करत असलेल्या कामातून आम्हाला आनंद मिळतोच, त्याचबरोबर नवनविन अनुभव येतो. त्यातून आम्हाला एक जगण्याची उमेद आणि उर्जा मिळते. जाणून घेवूया या प्रेरणादायी टुरिस्ट गाईडविषयी… (Kolhapur Tourism Story)

पर्यटकांना माहिती देताना अक्षय, आशा, सरिता आणि सचिन

Kolhapur Tourism Story : "जगात भारी कोल्हापूर"

"जगात भारी कोल्हापूर" म्हणून ओळखळा जाणाऱ्या कोल्हापुरचं निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक ठेवा देश-विदेशातील पर्यटकांना भूरळ घालतो. कोल्हापूर जिल्ह्यात श्री महालक्ष्मी, रंकाळा, पन्हाळा, जोतिबा, न्यू पॅलेस, खिद्रापूर, रांगणा, राधानगरी धरण, भूदरगड, विशाळगड आदी ठिकाणे विविधतेने समृद्ध अशी पाहायला मिळतील. पर्यटन ठिकाणे पाहायला कोल्हापुरात जगभरातून पर्यटक येत असतात.  १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील भवानी मंडपातील पागा इमारतीत पर्यटन माहिती केंद्राचे उद्घा‍टन झाले. तिथे पर्यटकांना माहिती देण्यासाठी  सरीता साळोखे, सचिन कांबळे, आशा कांबळे आणि अक्षय प्रभू  या दृष्टिबाधितांची टुरिस्ट गाईड म्‍हणून  निवड करण्यात आली. (Kolhapur Tourism Story) आणि सुरु झाला या चौघांचा टुरिस्ट गाईड प्रवास.

Kolhapur Tourism Story

दृष्टिबाधित व्यक्तींना टुरिस्ट गाईड म्हणून प्रशिक्षण?

 दृष्टिबाधित व्यक्तींना टुरिस्ट गाईड म्हणून प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना सक्षम करायचं, हे कसं सुचलं याबाबत वसिम सरकावस सांगतात, "मी माझ्या पर्यटन व्यवसायाची सुरुवात केली. त्याच दरम्यान एक दिवस दृष्टिबाधित विद्यार्थी कॅलेंडर विकत असताना दिसला. मनात विचार आला की, याची किती कॅलेंडर आम्ही विकत घेऊ शकतो. जास्तीत जास्त 50 कॅलेंडर विकत घेऊन मदत करू शकेन. दुसऱ्या दिवशी एक पर्यटक दुबईच्या सहली संदर्भात चौकशीसाठी आले होते. सहलीची आणि ठिकाणाची पूर्ण माहिती दिली. इत्यंभूत माहिती दिल्यानंतर त्यांनी मला विचारलं "तुम्ही किती वेळा दुबईला गेला आहात? " माझे उत्तर एकदाही नाही, प्रति प्रश्न, "मग इतकं छान दुबईविषयी कसं काय माहित." त्यानंतर माझ्या मनात एक विचार चमकला, जर मी दुबईला न जाता इतकी छान माहिती देऊ शकत असेल तर त्या दृष्टी बाधित मुलांना मी नक्कीच मदत करू शकेन. मग त्‍यांना टुरिस्ट गाईड  म्‍हणून घडविण्‍याचा प्रवास सुरू झाला.

Kolhapur Tourism Story : आणि 'बियाँड व्हीजन' टीमच ट्रेनिंग सुरु झालं

पर्यटन सल्लागार वसीम सरकावस सांगतात, "सर्वसामान्य विचारापलीकडे जावून एक विचार म्हणजे 'बियॉंड व्हीजन'. पारंपरिक न विचार करता दृष्टीबाधितही व्यक्ती आपल्या इच्छा आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कार्य करु शकते, आपली ओळख निर्माण करु शकते. यातून 'बियॉंड व्हीजन' ची निर्मिती झाली".

पर्यटन सल्लागार वसीम सरकावस प्रशिक्षण देताना. Kolhapur Tourism Story

सरीता, सचिन, आशा आणि अक्षय सांगतात सुरुवातीला टुरिस्ट गाईड या नोकरीसाठी सात-आठजण इच्छूक होती. त्यानंतर काही चाचण्यानंतर आमच्या चौघांची निवड झाली. प्रशिक्षण बाबतीत माहिती देताना ते सांगतात, आम्हाला एक महिना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण पर्यटन सल्लागार वसीम सरकावस व शरद अजगेकर यांनी दिले. हे प्रशिक्षण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने देण्यात आले. काहीवेळा आम्ही एखाद ठिकाणं ठरवुन त्या ठिकाणी एकत्र यायचो. तिथे आमचं प्रशिक्षण घेतलं गेले. ऑनलाईन पद्धतीने देताना गुगल मीटद्वारे देण्यात आले. इथे संवाद झाल्यानंतर आम्ही कोल्हापूर पर्यटन बाबतीत असणाऱ्य़ा ऑडिओ क्लिप्स ऐकत होतो. त्यातून कोल्हापूर बद्दलची सविस्तर माहिती मिळाली. ज्या माहितीबद्दल आम्हाला प्रश्न आणि शंका असतील त्याबबतीत आम्ही वसिम  आणि शरद आजगेकर यांना विचारायचो. अश्या पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण झाले.

Kolhapur Tourism Story

तुम्हाला पण माहिती हवी आहे का?

तुम्ही कोल्हापूर फिरायचा प्लॅन करत आहात? तुम्हाला कोल्हापूरमधील पर्यटन स्थळांची माहिती हवी आहे? आणि ती माहिती कुठून मिळवायची हा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही ०२३१-२५४५४११  या नंबरशी संपर्क करु शकता. सरीता, सचिन, आशा आणि अक्षय यांच्याकडून तुम्हाला हवी असलेली माहिती मिळेल. सचिन सांगतात की, "जर एखाद्या पर्यटकाकडून आम्हाला कोल्हापूर पर्यटन संबधित माहिती विचारली आणि ती सांगता आली नाही तर आम्ही पर्यटकांकडून काही मिनिटांचा अवधी मागून घेतो. त्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांकडून माहीती घेवून देतो. आम्हाला माहिती मिळाली नाही तर पर्यटकांचे प्रश्न, शंका आम्ही ब्रेल लिपीमध्ये टाईप करुन घेतो आणि आमच्या वरिष्ठांना पाठवून माहिती घेतो.

टुरिस्ट गाईड सचिन पर्यटकांचे प्रश्न ब्रेल लिपीमध्ये टाईप करताना…

 कोल्हापूर यादवनगरमधील सचिन कांबळे आता पट्टणकोडोली येथे वास्तव्याला आहेत,  हिंगणगावच्या आशा कांबळे या सध्या कळंबा येथे वास्तव्याला आहेत, सरिता साळोखे या कसबा वाळवे येथे वास्तव्याला आहेत. दररोज त्यांचा प्रवास सुरु असतो. या तिघांना जन्मजात अंधत्व आहे. हे तिघेहे एकट्याने प्रवास करतात. तर अक्षय प्रभू जो शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे वास्तव्याला आहे.  त्याला आकस्मित अंधत्व आले आहे. सध्या त्यांची आई त्यांच्यासोबत प्रवास करते. त्यांच्या अंधाऱ्या आयुष्यात पांढऱ्या काठीचा आधार खूप आहे. चौघेही सांगतात टुरिस्ट गाईड म्हणून काम करत असताना आम्हाला आनंद वाटतो. आम्हाला मिळालेली ही एक संधी आहे.

वसिम सरकावस, सरीता, सचिन, आशा आणि अक्षय यांच्यासोबत… Kolhapur Tourism Story

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT