Latest

कोल्हापूर : जेईई व नीट परीक्षा मार्गदर्शन सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद

मोहन कारंडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : नेमका आणि सातत्यपूर्ण अभ्यास, उत्तम शैक्षणिक वातावरण, पालकांचा भावनिक आधार आणि शैक्षणिक गुणवत्ताप्राप्त कुशल अध्यापक वर्ग या चार घटकांचा योग्य समतोल साधल्यास आयआयटी जेईई किंवा 'नीट'सारख्या परीक्षांत यश मिळते, असे प्रतिपादन आयआयटी, जेईई 'नीट' परीक्षा मार्गदर्शनासाठी आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

दै. 'पुढारी', 'इन्स्पायर अ‍ॅकॅडमी' आणि 'पेस आयआयटी अ‍ॅण्ड मेडिकल' यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्राला विद्यार्थी, पालकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी प्रा. विवेक घंगास म्हणाले, जेईईसाठी देशभरातून 12 लाख विद्यार्थी बसतात. देशातील 23 आयआयटीच्या साधारण 16 हजार जागा आणि राज्यातील आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतील 40 हजार जागा यात आपली जागा निश्चित करायची असेल तर यशस्वी होण्याची आकांक्षा, नियोजनपूर्वक आणि नेमका अभ्यास गरजेचा असतो.

प्रा. नीरज कुमार म्हणाले, स्पर्धात्मक वातावरणात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना कुटुंबाचा चांगला सपोर्ट आवश्यक असतो. मुलांबरोबर पालकांची अन्य शहरात जाण्याची तयारी असेल तरच मुलांना अन्य शहरात पाठवण्याचा निर्णय घ्यावा. तीव्र स्पर्धेमुळे अनेकदा मुलांची अभ्यास मधूनच सोडण्याची इच्छा होते. अशा वेळी कुटुंबीयांचा आधार त्याला पुन्हा उभारी देऊ शकतो.

एकदा गेलेली संधी आयुष्यात पुन्हा येत नाही. आता घेतलेले परिश्रम आणि खर्च केलेले पैसे चांगल्या संस्थेत प्रवेश मिळाल्यानंतर होणार्‍या फायद्यापुढे काहीच नसतात. त्यामुळे कोचिंगच्या फीचा विचार न करता त्या क्लासच्या गुणवत्तेचा, तेथील शिक्षण पद्धतीचा विचार करून मुलांसाठी शैक्षणिक संस्था निवडण्याचा निर्णय सजगपणे घ्यावा. शालेय परीक्षा आणि स्पर्धात्मक परीक्षा यांची गरज आणि स्वरूप वेगळे असते. त्याचा विचार करुन विद्यार्थ्यांनी करिअरचे नियोजन केले पाहिजे, असे मत प्रा. कमलकांत यांनी व्यक्त केले.

यावेळी जेईई, जेईई ऍडव्हान्स, नीट परीक्षांचे स्वरुप, त्यातील मार्किंग सिस्टीम, उपलब्ध जागा, कटऑफ टक्केवारी, पर्सेंटाईल संकल्पना काय असते याची सविस्तर माहिती विद्यार्थी, पालकांना देण्यात आली. शेवटी प्रश्नोत्तरांच्या सत्रातही विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. विक्रम रेपे यांनी सूत्रसंचालन केले. दै. 'पुढारी'चे सीनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर यांनी वक्त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT