भारतीयांच्या मनात विश्वास निर्माण करणारा उपक्रम | पुढारी

भारतीयांच्या मनात विश्वास निर्माण करणारा उपक्रम

‘मन की बात’ या उपक्रमाची आज (रविवार) शतकपूर्ती होत आहे. त्यानिमित्त…
एखादा वक्ता, कवी, अभ्यासक, विचारवंत किंवा शास्त्रज्ञ आपले विचार संवादातूनच व्यक्त करतो. त्या व्यक्त करण्याच्या प्रकाराला ‘इये हृदयीचे तिये हृदयी घातले’, असे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे. एखादा राष्ट्रप्रमुख संवादाच्या माध्यमातून जेव्हा राष्ट्रातील जनतेला मार्गदर्शन करतो तेव्हा तो खर्‍या अर्थाने एका राष्ट्राचा सेनापती ठरतो, गुरू ठरतो, यशस्वी पालक ठरतो.

आज जगातील अनेकविध राष्ट्रांच्या प्रमुखांचा विचार केला, तर अशा संवादातून जनतेशी आपलेपणाचे नाते जोडणारे एकमेवाद्वितीय राष्ट्रप्रमुख म्हणून केवळ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घ्यावे लागेल. पंतप्रधान म्हणून राष्ट्राचा सेवक ही भूमिका जाहीर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानाला सन्मानाचे आणि आदराचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम देशवासीयांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी त्यांनी कृष्णनीती अनुसरली, असे वाटते. त्यांनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली, त्यावेळी भारतातील जनतेची मानसिकता भयग्रस्ततेची होती. आपण इतर कोणत्याही राष्ट्रातील माणसांपेक्षा कमकुवत आहोत.‘अरे’ ला ‘का रे’ म्हणण्याची आपल्यात कुवत नाही, अशी आमची आम्ही किंमत करून घेतली होती. परंतु नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीच्या विचारधारणेत किती अफाट शक्ती भरलेली आहे, याची जाणीव करून दिली. शास्त्रज्ञांचा वेळोवेळी गौरव करून त्यांच्या संशोधनाचे महत्त्व जनतेला विशद केले. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. शेती विषयक समस्या दूर करून धन-धान्याने भारत समृद्ध व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रातील जनतेशी ‘मन की बात’ या अपूर्व कार्यक्रमातून वैयक्तिक नाते जोडले. स्वकीय नातेबंधातील माणसांना सभोवताली विरोधक म्हणून पाहून हातातील गांडीव जमिनीवर टाकलेल्या अर्जुनाला त्याच्या अधिकारासाठी त्याची योग्यता लक्षात आणून देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याला दिव्यसंदेश देण्यासाठी भगवद्गीतेच्या अठरा अध्यायांतून संवाद साधून कर्तव्याची जाणीव करून दिली होती. अगदी तेच महान कार्य ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी साध्य केले.

त्यामुळे जगतातील अन्य राष्ट्रांच्या तुलनेत आपणही कसे तुल्यबळ आहोत, याची जाणीव भारतीयांना झाली. त्यामुळे अर्थातच एक उत्साहपूर्ण वातावरण भारतात निर्माण झाले. भारतातील जनतेत एक प्रकारचा उत्साह आणि विश्वास निर्माण करण्यात पंतप्रधान मोदी यशस्वी झाले. शिवाय ‘मन की बात’ मधून व्यक्त होणार्‍या विचारातून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची जाणीव भारतीयांना झाली. ते दूरदर्शी विचार ऐकून जगातील बहुतेक देशांचे नेते दिग्मूड झाले. राष्ट्राचा नेता कसा असावा; तर श्री. नरेंद्र मोदी यांच्यासारखा, अशी सर्वांनी मनापासून मान्यता दिली. अन्य राष्ट्रप्रमुखांच्या मागे मागे राहणारे भारताचे नेते केवळ मोदी यांच्याच रूपाने सर्वात पुढे सन्मानाने चालू लागले. स्वाभिमानाने अमेरिका, रशिया, चीन, जपान अशा राष्ट्रप्रमुखांचे नेतृत्व मोदी करीत आहेत. ते सर्व ‘मन की बात’ या अपूर्व संकल्पनेच्या पायावर उभे राहिले, हे निश्चित. या कार्यक्रमाद्वारे मोदी यांनी जनजागरणाचे एक अभूतपूर्व कार्य केले आहे, हे मात्र खरे.
– आशा खाडिलकर, माधव खाडिलकर

Back to top button