अभिलाषने दुसर्‍या क्रमांकासह जिंकली जगातील सर्वात कठीण रेस!

अभिलाषने दुसर्‍या क्रमांकासह जिंकली जगातील सर्वात कठीण रेस!

पॅरिस : गोल्डन ग्लोब या समुद्री शर्यतीत भारताने नवा इतिहास रचला. भारतीय नौदलातील निवृत्त कमांडर अभिलाष टॉमी ही शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांनी यात दुसरा क्रमांक मिळवला. या शर्यतीत नाविक केवळ एकट्याने पूर्ण जगाची परिक्रमा करतात. ही स्पर्धा मागील वर्षी दि. 4 सप्टेंबर रोजी फ्रान्समधून सुरू झाली. गोल्डन ग्लोब रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.

अभिलाष टॉमीने भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 वाजता फिनिश लाईन पार केली. अभिलाषने या स्पर्धेसाठी बायनट ही नाव वापरली. तब्बल 236 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर शनिवारी अभिलाष फ्रान्सच्या किनार्‍यावर पोहोचला. 44 वर्षीय अभिलाष ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीयच नव्हे, तर पहिला आशियाई देखील ठरला.

दक्षिण आफ्रिकेची 40 वर्षीय नाविक कर्स्टन न्यूसचफरने गुरुवारी रात्री ही शर्यत पूर्ण करत पहिले स्थान संपादन केले होते. ही स्पर्धा जिंकणारी न्यूसचफर जागतिक स्तरावरील पहिली महिला आहे. तिला या स्पर्धेतील शेवटचे 2-3 समुद्री मैल पार करण्यासाठी बरेच तास लागले. वार्‍याचा वेग अचानक जवळपास शून्यावरच आल्याने कर्स्टनला थोडा वेळ द्यावा लागला.

गोल्डन ग्लोब ही जागतिक स्तरावर सर्वात लांब व सर्वात संथ रेस मानली जाते. या स्पर्धेत 16 स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात अत्याधुनिक नेव्हिगेशन उपकरणांचा वापर करण्याची परवानगी असत नाही. यंदा या स्पर्धेत केवळ 3 स्पर्धक फिनिश लाईन पार करू शकले. यापूर्वी, 2018 मध्येही अभिलाष टॉमीने या कठीण स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र, मध्यात त्याला समुद्री तुफानाचा सामना करावा लागला आणि त्याचा नाईलाज झाला. पुढे तो तीन दिवसांपर्यंत आपल्या नावेत एकाच ठिकाणी पडून होता. नंतर त्याला हेलिकॉप्टरमधून यातून बाहेर काढण्यात आले. यंदा मात्र त्याने ही कठीण स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news