Latest

कोल्हापूर : येथे गरिबांना फक्त ५ रुपयांत मिळते व्हेज-नाॅनव्हेज जेवण

backup backup

अमोल पाटील, पुढारी ऑनलाईन

टाळेबंदीच्या काळात कोल्हापूर शहरात केवळ ५ रुपयांत सकस आहार देऊन गोरगरिबांच्या पोटाची सोय करणारी 'उत्तरेश्वर थाळी'चं (Uttareshwar Thali) कौतुक राज्य, देश आणि देशाबाहेर झालेलं आहे. कोरोना आणि टाळेबंदी शिथील झाली. पण, थाळी बंद झाली नाही. आजही 'मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट'च्या माध्यमातून अविरतपणे उत्तरेश्वर थाळी गरिबांच्या मुखापर्यंत पोहोचविण्याचं अविरतपणे सुरू आहे. दानशूर लोकांपर्यंत त्यांचं कार्य पोहोचलं आहे आणि विविध स्तरातून मदतीचा ओघ वाढू लागला आहे.

सध्या शहरातील सधन कुटुंबातील लोक घरातील आनंद सोहळ्यानिमित्ताने ट्रस्टकडे येताहेत आणि आर्थिक मदतीचा हात देऊ करताहेत. घरातील सणवार, धार्मिक विधी, वाढदिवस, लग्नसमारंभ, जावळ, आप्तस्वकियांच्या स्मृतीदिनानिमित्ताने संबंधित कुटुंबातील प्रमुख मंडळी सर्वांच्या संमतीने 'मातृभूमी चॅरिटेबल ट्रस्ट'च्या कार्यकर्त्यांकडे संपर्क साधतात आणि १००० रुपयांपासून अगदी २ लाखांपर्यंतची मदत दिली जात आहे. त्यातूनही ट्रस्टला आर्थिक मदत होते आणि गरिबांच्या उत्तरेश्वर थाळी वाटपाचं कामं व्यवस्थित सुरू राहत आहे. इतकंच नाही इतक्या कमी पैशांत दर्जाही टिकून आहे.

मोबदल्याची अपेक्षा न करता 'ते' कार्यकर्ते पुरवताहेत सेवा 

उत्तरेश्वर थाळी (Uttareshwar Thali) आता गरीबांच्या आणि गरजूंच्या पोटाची सोय करणारी ठरली आहे. त्याच्या कामाचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे. त्यातूनच ट्रस्टच्या कामाला हातभार म्हणून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अनेक जण काम करताहेत. ज्यांना ट्रस्टला मदत करायची आहे. पण, आर्थिक परिस्थिती नाही. ते लोक दररोज येऊन जेवण वाटपामध्ये आपल्या कामाचा वाटा उचलत आहेत.

कोण स्वयंपाक घरात जेवण करण्यात मदत करतं, तर कोण थाळी घेण्यासाठी आलेले गरिबांची रांग लावण्याचं काम करतं, तर कोण त्यांची नावं लिहून, कामाचा हिशेब लिहून ठेवण्याचं काम करतं. अशा पद्धतीने उत्तरेश्वर थाळीच्या माध्यमातून अनेक जणांनी समाजसेवेचा आपल्या कुवतीप्रमाणे विडा उचललेला आहे. सध्या रविंद्र जाधव, शितल सुतार, सचिन जोशी, युवराज जाधव, सम्राट शिर्के, रोहन गवळी, युवराज मेस्त्री, ईश्वर पाटील, महेश अनावकर, सोनु शिंदे, अजिंक्य कदम आदी मंडळी सेवा पुरवताहेत.

… असा दिला जातो सकस आहार

आठवड्यातील सातही दिवस या ठिकाणी गोरगरिबांना अवघ्या ५ रुपयांत घरगुतीचे पद्धतीचं जेवण दिलं जात आहे. त्यामध्ये दोन चपाती, मसाले भात, भाजी, आमटी, स्वीट असे पदार्थ असतात. याशिवाय बुधवारी अंडाकरी थाळी आणि रविवारी चिकनची थाळी, असंही अवघ्या ५ रुपयांमध्ये दिले जातात. सणासुदीच्या दिवशी पुरणपोळीदेखील दिली जाते. विशेष करून संकष्टी आणि एकादशीवेळी उपावासाचे पदार्थ किंवा फळे मोफत दिले जातात.

ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण सांगतात की…

ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेंद्र भूपाल चव्हाण पुढारी ऑनलाईन टीमला सांगतात की, "लाॅकडाऊनच्या काळात सर्वच बंद होतं. यावेळी गरिबांच्या, भिक्षेकरूंच्या पोटाचे हाल होऊ लागले. त्यामुळे आम्ही मित्रमंडळी सुरुवातीच्या काळात पदरचे पैसे काढून पार्सल स्वरूपात उत्तरेश्वर थाळी देण्याचे ठरवलं. पहिल्याच दिवशी ३०० गरजू लोकांनी ५ रुपयांमध्ये थाळी विकत घेतली. नंतर उत्तरेश्वर थाळी कोल्हापुरात प्रचलित झाली, तसा मदतीचा ओघदेखील वाढला. सध्या लाॅकडाऊन नाही, पण तरीही आपण १५० लोकांना रोज उत्तरेश्वर थाळी ट्रस्टतर्फे दिली जात आहे."

सध्या विविध स्तरातील लोकांकडून वाढदिवस, लग्न किंवा इतर आनंद सोहळ्यानिमित्ताने ट्रस्टला हजार रुपयांपासून ते २ लाखांपर्यत मदत दिली जात आहे. राजेंद्र चव्हाण यांनी उदाहरण देताना सांगितलं की, मध्यंतरी एक ग्रहस्थ आले होते, त्यांची एकुलती एक कन्या वयाच्या २४ व्या वर्षी देवाघरी गेली. ती जाऊन ४ महिने झाले होते. त्या महिन्यात त्यांच्या कन्येचा वाढदिवस होता. त्यांच्या मुलीला समाजकार्य फार आवडत होतं. त्यामुळे त्या ग्रहस्थांनी ५००० रुपयांची मदत केली. त्यांच्या हस्ते गरीब लोकांना उत्तरेश्वर थाळीचे वाटप करण्यात आले. काही लोक असेही आहेत जे दर महिन्याला नियमितपणे ट्रस्टकडे पैसे पाठवत असतात.

पहा व्हिडीओ : कोल्हापुरातील ५ रुपयांची उत्तरेश्वर थाळी गरिबांना उपाशी राहू देत नाही

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT