Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांनी जपले कोल्हापूरशी ऋणानुबंध!

Dr. Babasaheb Ambedkar : बाबासाहेबांनी जपले कोल्हापूरशी ऋणानुबंध!
Published on
Updated on

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कोल्हापूरशी विशेष ऋणानुबंध होते. 1952 मध्ये राजाराम महाविद्यालयाच्या गॅदरिंगला उपस्थित राहून त्यांनी ज्ञानप्रक्रियेबाबत विचार मांडले. याच भेटीत त्यांनी बिंदू चौकात उभारलेला स्वत:चा पुतळा पाहिला हे विशेष.

बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अनेकवेळा त्यांना गॅदरिंगसाठी निमंत्रणे आली. परंतु त्यांनी ती स्वीकारली नाहीत. 1952 मध्ये राजाराम महाविद्यालयाचे निमंत्रण मात्र त्यांनी स्वीकारले. गावोगावी तोरणे उभारून, कमानी उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माईसाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत होत्या.

24 डिसेंबर 1952 रोजी त्यांनी राजाराम महाविद्यालयाच्या गॅदरिंगमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून इंग्रजीत भाषण केले. 'राजारामियन' या नियतकालिकाच्या 1953 च्या अंकात भाषणाचा वृत्तांत प्रकाशित झाला आहे. 'डॉ. आंबेडकरांचे ज्ञानाचे शिखर' असे शीर्षक नियतकालिकाने वृत्तांतास दिले आहे.

ज्ञानप्रक्रियेबाबत महत्त्वाचे भाषण डॉ. आंबेडकर यांनी केले. भाषणात ते म्हणतात, 'विद्यार्थी हा विद्यार्थी असला पाहिजे. ज्ञानाचा पाठपुरावा करतो तो विद्यार्थी होय. लग्‍न करीत नाही तो ब्रह्मचारी नव्हे तर ब्रह्मचारी म्हणजे जो अत्यंत उत्कटपणे ज्ञान मिळवतो तो!' भारतीय, ब्रिटिश व अमेरिकन अशा विविध पाच विद्यापीठांत मी शिकलो. महाविद्यालयात प्राध्यापक व प्राचार्य म्हणून काम केले; पण माझा ज्ञानाचा व्यासंग कधीच कमी झाला नाही.

महाविद्यालयीन शिक्षणाचे दोन उद्देश त्यांनी भाषणात सांगितले. पहिला अस्तित्वाच्या संघर्षासाठी जीवनाच्या सागरातील विविध विषयांच्या ज्ञानाचा पुरेसा साठा एकत्रित करणे; तर दुसरा सभोवतालचे व भूतकाळातील जीवन समजून घेण्यासाठी माणसाने बुद्धी वापरणे. वर्तमान हा भूतकाळाचा वारसा व भविष्याची तयारी असते. युरोप व अमेरिकेतील विद्यार्थी अशा ज्ञानाने सुसज्ज आहेत. प्राध्यापक व डेमॉन्स्ट्रेटर्स या दोघांकडून कोलंबिया विद्यापीठातील वर्ग चालविला जात असे. या दोघांतील कामाची विभागणी डॉ. आंबेडकरांनी भाषणात स्पष्ट केली.

बाबासाहेबांनी पाहिला स्वत:चाच पुतळा! (Dr. Babasaheb Ambedkar)

कोल्हापूर भेटीप्रसंगी राजाराम महाविद्यालयातील कार्यक्रमास डॉ. आंबेडकर उपस्थित होते. त्यानंतर बिंदू चौकात करवीरच्या जनतेने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली उभारलेला स्वत:चा पुतळा 'याचि देही याचि डोळा' डॉ. आंबेडकर यांनी पाहिला. हाच त्यांचा जगातील पहिला पुतळा होय. याभेटीदरम्यान प्राचार्य पत्रावळे यांच्या घरी जिमखानाप्रमुख पी. डी. कदम, विद्यार्थी खाशाबा जाधव (ऑलिम्पिक पदक विजेते) यांनी डॉ. आंबेडकर यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतल्याचा उल्‍लेख आढळतो.

राजाराम महाविद्यालयाच्या गॅदरिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानप्रक्रियेबाबत व उच्च शिक्षणाबाबत महत्त्वाचे भाषण केले. यातून विद्यार्थी व शिक्षणाप्रती असणारी त्यांची आस्था अधोरेखित होते. डॉ. आंबेडकर यांचे कोल्हापूरशी वेगळे नाते राहिले आहे. बाबासाहेबांची ही शेवटची कोल्हापूर भेट ठरली.
– प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन,
संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news