कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचे सौंदर्य खुलणार… | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचे सौंदर्य खुलणार...

कोल्हापूर ; सागर यादव : प्राचीन स्थापत्याचा आविष्कार असणार्‍या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे सौंदर्य पूर्ववत खुलणार आहे. कालौघात आधुनिक जमान्यातील संगमरवरी फरशा, ऑईल पेंट व तत्सम प्रकारच्या गोष्टींमुळे मंदिराचे मूळ सौंदर्य झाकोळले आहे. त्यातून मंदिराच्या स्थापत्याची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत.

मंदिरात सन 1990 च्या सुमारास तत्कालीन भाविकांच्या पुढाकाराने संगमरवरी फरशी बसविण्याचे काम करण्यात आले. गरुड मंडपाशेजारी गणेश मंदिरापासून ते देवीच्या गाभार्‍यापर्यंत आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरील दगडी फरशा, दगडी भिंती व छतासह दगडी नक्षीदार खांबांवर संगमरवरी फरशा बसविण्यात आल्याने मंदिराचा नैसर्गिक गारवा कमी झाला. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भक्‍तांची गर्दी वाढू लागल्याने मंदिरातील तापमानातही वाढ होत गेली.

‘पुरातत्त्व’कडून 70 ते 75 बदलांच्या सूचना

2003 ला यासंदर्भात याचिका दाखल करून नव्याने लावण्यात आलेल्या फरशीमुळे अंबाबाई मंदिराच्या मूळ स्थापत्य झाकल्यामुळे सौंदर्यात बाधा येत असल्याने ही फरशी काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. सुनावणीनंतर 2013 च्या निकालानुसार पुरातत्त्व विभागाने पाहणी करून सन 1947 पर्यंत असणार्‍या मूळ स्वरूपानुसार मंदिरात झालेल्या 70 ते 75 बदलांबाबत सूचना करण्यात आल्या होत्या, अशी माहिती मंदिराचे अभ्यासक अ‍ॅड. प्रसन्न मालेकर यांनी दिली.

किरणोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याचे प्रयत्न

मंदिराच्या मूळ स्वरुपात बाधा ठरणारे आणि ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या संगमरवरी फरशा काढण्याच्या कामाची निविदा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. 14 डिसेंबरपर्यंत निविदा भरण्याची मुदत असून, आगामी किरणोत्सवापर्यंत काम पूर्ण करण्याचा समितीचा मानस आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे 10 लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

तांत्रिक कारणांनी काम थांबले

पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिरातील संगमरवर फरशा काढण्याचे काम 2014 ला सुरू करण्यात आले. गाभार्‍याभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गातील दुतर्फा असणार्‍या भिंतींना मोठ्या प्रमाणात लावलेल्या जाड संगमरवरी दगडी फरशी फोडण्यात आली. यामुळे मंदिराचे मूळ दगड खुले झाले. मात्र पुढे काही तांत्रीक कारणांनी काम थांबल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवडी यांनी दिली.

कोरोनामुळे विकास कामे लांबणीवर

गतवर्षी मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडीटसह संगमरवरी फरशी काढणे, मणकर्णिका कुंडाचे उत्खनन, भक्‍त निवास उभारणी, पार्किंग यासह देवस्थान समितीची विविध विकास कामे सुरु करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे ही कामे लांबणीवर पडली होती. नुतन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष राहुल रेखावार यांनी पदभार स्विकारल्यानंतर मंदिराची सविस्तर पाहणी करून मंदिराच्या प्रलंबीत कामांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

मंदिरात ठिकठिकाणी लावण्यात आलेला अनावश्यक चुना काढण्यासाठी वॉर्म वॉटर प्रोसेसचा अवलंब करण्यात येणार आहे. यानंतर मूळ स्थापत्याला धोका पोहोचू नये यासाठी आधुनिक यंत्राचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनेच संगमरवरी फरशी काढण्यात येणार आहे.
-शिवराज नाईकवाडे, सचिव, देवस्थान समिती

संगमरवरी फरशी बसविताना मोठ्या प्रमाणात सिमेंटचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ठिकठिकाणी दोन ते चार इंचांपर्यंतचे थर निर्माण झाले आहेत. पायातील फरशीवरील संगमरवर काढण्याचे काम जलद होईल; पण भिंतींसह नक्षीदार खांबांवरील फरशी काढण्याचे काम अवघड असणार आहे.
-अमरजा निंबाळकर, अध्यक्षा, आर्किटेक्ट तथा हेरिटेज समिती

Back to top button