Latest

कोल्हापूर : शिंदे गटाचे जिल्ह्यातील काही शिलेदार स्वगृही परतणार?

मोहन कारंडे

कोल्हापूर; विकास कांबळे : राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे राज्यपातळीवर शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे, तशीच परिस्थिती जिल्ह्यातील शिंदे गटामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेले जिल्ह्यातील काही शिलेदार पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपने शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली. शिवसेनेत उभी फूट पाडली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करत भाजपने राज्यात सरकार स्थापन केले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर चांगलीच मर्जी जडली. शिंदे ४० आमदार घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी खासदारही मोठ्या प्रमाणात फोडले. त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातदेखील उमटले. जिल्ह्यातील शिवसेनादेखील दोन गटांत विभागली जाऊ लागली. जिल्ह्यातील लोकप्रतिधींनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना फुटल्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता घटेल, अशी भाजपची अपेक्षा होती. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून करण्यात येणाच्या विधानांची उलटसुलट चर्चा होऊ लागली. ठाणे वगळता मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रभाव जाणवत नसल्याचे भाजपच्या गोटात चर्चा होऊ लागली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळविला.

अजित पवारच भाजपच्या गळाला लागल्यामुळे राष्ट्रवादीत देखील उभी फूट पडली. त्यामुळे शिवसेनेसारखीच राष्ट्रवादीची देखील अवस्था झाली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये देखील दोन गट संपूर्ण राज्यात दिसू लागले.

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली

जिल्हा पातळीवरदेखील कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) अशी आघाडी झाली. शरद पवार यांनी महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे काही जिल्ह्यात त्यांची ताकद अधिक असल्यामुळे लोकसभा निवडणुकीची गणित आतापासून मांडण्यास सुरुवात झाली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीची देखील आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या राजकीय समीकरणामुळे जिल्ह्यातील शिंदे गटासोबत गेलेले काही शिलेदार स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT