Latest

कोल्हापूर : जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह १५ जणांवर गुन्हे दाखल

दिनेश चोरगे

शिरोली पुलाची; पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीररित्या पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर ऊसदरासाठी गुरूवारी (दि.२३) चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरूवारी (दि. २३) जमावबंदीचा आदेश लागू केला होता. तरीही मागील वर्षाच्या उसाला अतिरिक्त ४०० रुपये दर द्यावा, व चालू हंगामासाठी ३५०० रुपयांचा हप्ता द्यावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी पुणे- बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते. जमावबंदीचा आदेश मोडून पंचगंगा पुलाजवळ बेकायदेशीर जमाव करून आंदोलन करीत महामार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता.

या प्रकरणी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, प्रदेशाध्यक्ष, प्रा. जालंदर पाटील, उपाध्यक्ष विक्रम पाटील, नागाव माजी सरपंच अरुण माळी, राहुल पाटील, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, सागर मादनाईक, अनिल चव्हाण, स्वस्तिक पाटील, अशोक ऐतवडे, शाहरुख पेंढारी, शरद पाटील, अजित पोवार, बंडू पाटील आदीसह शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत निलेश कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरोली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक घोगरे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT