नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर 'इंडिया' या नावाने ओळखले जाते आणि या नावाचा इतिहासही मोठा आहे. तथापि, प्राचीन काळापासून भारताला वेगवेगळ्या सात नावांनी ओळखले जात असे. आता पुन्हा एकदा 'इंडिया' आणि 'भारत' हा विषय ऐरणीवर आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्याच कलमामध्ये 'इंडिया दॅट इज भारत,' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे इंग्रजीमध्ये 'इंडिया' आणि भारतीय भाषांमध्ये 'भारत' असे नाव आपण स्वीकारले आहे.
जंबुद्वीप
प्राचीन काळात भारताला 'जबुद्वीप' या नावाने ओळखले जायचे. हा शब्द दोन नावांपासून तयार झाला आहे, जम्बू आणि द्वीप. जम्बू म्हणजे जांबुळ आणि द्वीप म्हणजे भूमी. म्हणजे जांभळांच्या वृक्षाची भूमी, अशी भारताची ओळख होती.
आर्यावर्त
ऋग्वेदामध्ये भारतीय उपखंडाला आर्यावर्त असे म्हटले जात होते. अनेक पुराणांत या नावाचा उल्लेख आढळतो. प्राचीन काळात आर्य लोक इराणवरून भारतीय उपखंडात आले आणि त्यांनी या ठिकाणी आपली वस्ती निर्माण केली. त्यामुळे ते राहत असलेल्या भूमीला 'आर्यावर्त' असे म्हटले जात होते. महाभारतामध्येही या नावाचा उल्लेख आढळतो.
भारत खंड
भारताला प्राचीनकाळी भारत खंडही म्हटले जात असे. यामध्ये अफगाणिस्तानपासून ते बांगला देशपर्यंतच्या भूमीचा समावेश होता.
भारत किंवा भारतवर्ष
आपल्या देशाला भारत नाव पडले आहे ते प्राचीन काळातल्या भरत राजावरून, असेही सांगितले जाते. दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र चक्रवर्ती सम्राट भरत होता. त्याच्या नावावरून उत्तर भारतात राहणार्या समूहाला भारत, असे म्हटले जात असे. काही पुराणांत असे म्हटले आहे की, ऋषभदेवचा पुत्र भरत याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे नाव पडले. भरत किंवा भारत म्हणजे संपूर्ण भारतीय उपखंड, अशी ओळख होती.
हिंदुस्थान
हिंदू या शब्दाची उत्पत्ती ही सिंधू या नावापासून झाली. अरबी लोकांना सिंधू हे नाव म्हणता येत नव्हते. त्यामुळे त्याचा अपभ्रंश होऊन ते हिंदू असे झाल्याचे सांगितले जाते. पुढे हिंदू हेच नाव प्रचलित झाले. हिंदू ज्या ठिकाणी राहतात ती भूमी म्हणजे हिंदुस्थान. हिंदुस्थान हे नाव मुघलांच्या काळात प्रचलित झाले. हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने राहत असल्यामुळे मुघल या देशाला 'हिंदुस्थान' असे म्हणत होते.
ब्रिटिशांच्या काळात भारताला 'इंडिया' असे म्हटले जात असे. प्राचीन हडप्पा-मोहेंजोदडो संस्कृती ही पाश्चिमात्य देशांमध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणून ओळखली जात असे. सिंधू नदीला पाश्चिमात्य लोक इंडस रिव्हर म्हणायचे. त्यामुळे या संस्कृतीला त्यांनी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हटले. त्यावरून या देशाला लॅटिन भाषेमध्ये इंडे असे म्हटले जात असे. ब्रिटिशांकडून इंडे या नावानंतर बोलता बोलता 'इंडिया' असे संबोधले जायचे. त्यानंतर हेच नाव प्रचलित झाले.
आता इंग्रजीमध्ये असलेल्या 'इंडिया' या नावामध्ये बदल केला जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. 'इंडिया' हे नाव भारताच्या राजपत्रातून कायमचे हद्दपार करून या देशाला फक्त 'भारत' या नावाने आंतरराष्ट्रीय ओळख मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा :