G-20 मध्‍ये चीन-रशिया राष्‍ट्राध्‍यक्षांची अनुपस्थिती, जयशंकर म्‍हणाले, 'काही फरक पडत नाही...' | पुढारी

G-20 मध्‍ये चीन-रशिया राष्‍ट्राध्‍यक्षांची अनुपस्थिती, जयशंकर म्‍हणाले, 'काही फरक पडत नाही...'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नवी दिल्‍ली येथे होणार्‍या G-20 परिषदेसाठी (G20 summit) भारत सज्‍ज झाला आहे. मात्र या परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची अनुपस्‍थिती चर्चेचा विषय ठरली आहे. आता यावर परराष्‍ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

देशांचे कोण प्रतिनिधी येतात, त्‍यापेक्षा देशाची भूमिका महत्त्‍वाची

नवी दिल्‍ली येथे होणार्‍या G-20 परिषदेसाठी रशियाच्‍या वतीने परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरोव तर चीनचे प्रतिनिधित्‍व पंतप्रधान ली कियांग करणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्‍या अनुपस्‍थितीवर बोलताना भारताचे परराष्‍ट्रमंत्री जयशंकर म्‍हणाले की, :G-20 मध्ये राष्ट्रप्रमुख न येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही असे अनेक प्रसंग आले आहेत. या परिषदेमध्‍ये यापूर्वीही काही राष्ट्रपती आणि पंतप्रधान काही कारणास्तव वैयक्तिकरित्या येऊ शकले नाहीत. यामुळे काही फरक पडत नाही. G-20 परिषदेमध्‍ये देशांचे कोण प्रतिनिधी येतात, त्‍यापेक्षा देशाची भूमिका महत्त्‍वाची ठरते. माझ्‍या मते G-20 परिषदेमध्‍ये सहभागी होणारे सर्वच देश मोठ्या गांभीर्याने या परिषदेकडे पाहतात.” (G20 summit)

यावेळी परराष्ट्रमंत्र्यांना रशिया-युक्रेन युद्धाबाबतही विचारण्यात आले. यावर जयशंकर म्हणाले, ” माझ्या मते या परिषदेत सहभागी होणारे देश आपल्‍या देशाचे प्रतिनिधित्‍व करतात. ते आपली भूमिका मांडतील. मात्र परिषदेत कशावर चर्चा होणार यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी.”

हेही वाचा :

 

 

Back to top button