Latest

Dosa : विश्वास नाही बसणार पण डोश्याला आहे ‘इतक्या’ हजार वर्षांचा इतिहास

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : कोल्हापुरातील शिवाजी पेठ असो किंवा पॅरिसमधील लिटल जाफना अशा सर्व ठिकाणी हमखास मिळणारा पदार्थ म्हणजे डोसा. (Dosa) जगभरातील खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा जर कोणता पदार्थ असेल तर तो म्हणजे डोसा. पण तुम्ही आवडीने खात असलेला डोसा किती जुना आहे याची तुम्हाला कल्पना नसेल. याचं उत्तर आहे २ हजार वर्षं. होय! चक्क २ हजार वर्षांपासून हा चवदार पदार्थ आपली भूक भागवत आहे. (Dosa)

डोसा अस्सल दक्षिण भारतीय पदार्थ आहे. या पदार्थाचा पहिला उल्लेख तामिळ संगम साहित्यात आहे. स्टोरी ऑफ अवर फूड या पुस्तकात के. टी आचार्य म्हणतात- राजा सोमेश्वर तिसरा यांनी लिहिलेल्या मनसोलासा या ग्रंथात 'डोसाका' या पदार्थाचा उल्लेख आहे. पण डोश्याचे पूर्वज म्हणजे मेल्ल अदाई आणि अप्पम फार पूर्वीपासून तामिळ भागात खाद्यसंस्कृतीचा घटक होते. तिसऱ्या आणि चौथ्या शतकातील मुधराईकांची या संगम साहित्यात 'अप्पण' आणि 'मेल्ल अदाई' या दोन पदार्थांचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात डोसा हा शब्द फार नंतर प्रचलित झाला असेल असे तज्ज्ञांना वाटते. सेंथन दिवाकरम या १० व्या शतकातील ग्रंथात 'डोसई' या पदार्थाचा उल्लेख आहे. 'डोसई' हा 'अप्पम'चा एक प्रकार असून तो नारळाच्या दुधासोबत खाल्लला जातो, असे या ग्रंथात नमुद आहे.

पण सुरुवातीच्या काळात डोसा मऊ असायचा. आता जो कुरकुरीत डोसा बनतो त्याचे श्रेय 'उडपी'ला जाते. उडपी येथील बल्लवाचार्यांनी १९व्या शतकात कुरकुरीत असा डोसा बनवण्यास सुरुवात केली. या आचाऱ्यांसोबत २०व्या शतकात ही रेसिपी भारताच्या वेगवेगळ्या भागात पोहोचली. 'डोसाका' हा शब्द आर्युवेदातही आहे, असे बीबीसीने एका लेखात म्हटले आहे. दक्षिण भारतातील अनेक मंदिरात डोसा हा पूजाविधीतील पदार्थ आहे, आणि त्याच्या पाककृती या वेगळ्या असतात. उदाहरणात तामिळनाडूतील कांचिपूरम येथे वरदराजा पेरुमल मंदिरात १६व्या शतकातील एक शिलालेखावर डोश्याची पाककृती कोरली आहे.

काळाच्या ओघात डोश्याचा पाककृतीत बदल झाले आहेत. डोसा बनवण्याची कृती अशी आहे की त्यात वेगवेगळे प्रयोग करता येतात. उदाहणात शेजवान डोसा हा चायनिज अवतार तर बटर पनीर मसाला डोसा या उत्तर भारतीय रुपातही डोसा मिळतो. इतकेच काय तर मॅकडोनल्डने मॅकडोसा मसाला बर्गर हा डोसा कम बर्गर २०१९ला लाँच केला होता.

जो थाट बिर्याणीचा आहे तोच मसाला डोसाचा शाकाहारी पदार्थांत आहे. StatEATistics report या अहवालानुसार कोरोना महामारीच्या काळात भारतात सर्वांत जास्त ऑर्डर केलेली डिश ही मसाला डोसा होती, यावरून डोश्याच्या महतीचा अंदाज आपणाला येऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT