Latest

‘कमी साखर’ही धोक्याचीच ! रक्‍तातील साखर कमी होण्याची लक्षणे कशी ओळखाल ?

backup backup

डॉ. संतोष काळे

डायबेटिस म्हणजे मधुमेह आपल्या देशात एक सर्वसामान्य आजार आहे. आपल्या देशातील दर पाच व्यक्‍तींमध्ये एक व्यक्‍ती मधुमेहाचा रुग्ण असतो. मधुमेह म्हणजे रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढणे. मधुमेहाच्या भीतीने अनेक जण साखर किंवा गोड पदार्थ खायचे टाळतात आणि मग अशी वेळ येते की, त्यांच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाणच कमी होऊन जाते. मग डॉक्टर त्यांना गोड पदार्थ मुद्दाम खायला सांगतात. रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढणे जसे धोक्याचे असते, तसेच ते कमी होणेही तितकेच धोक्याचे असते. याविषयी…

रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी होणे धोक्याचे असते. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये असा धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते; पण निरोगी व्यक्‍तींमध्येही हा धोका असतो. साखर किंवा ग्लुकोज आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचा मुख्य स्रोत आहे. ही साखर रक्‍ताच्या माध्यमातून आपल्या शरीरातील सर्व इंद्रियांपर्यंत पोहोचते म्हणजे रक्‍तातील साखर आपल्या शरीराची मूलभूत गरज आहे. रक्‍तातील साखरेचे प्रमाण वाढणे जसे धोक्याचे असते, तितकेच तिचे रक्‍तातील प्रमाण कमी होणेही धोक्याचे असते. रक्‍तातील साखर कमी होण्याच्या स्थितीला हायपोग्लायसेमिया असे म्हणतात. रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने किडनीची समस्या, हिपेटायटिस, यकृताचे विकार, मानसिक संतुलन बिघडणे, अस्वस्थता, चक्‍कर येणे अशासारख्या अनेक समस्या निर्माण होतात.

रक्‍तातील साखर कमी होण्याची लक्षणे

कडकडून भूक लागणे

पोटभर जेवण झाल्यानंतरही आपले पोट रिकामे आहे असे वाटणे किंवा कडकडून भूक लागणे हे आपल्या शरीराला आणखी ग्लुकोजची आवश्यकता आहे, याचे लक्षण आहे.

झोप न येणे

हायपोग्लायसेमिया हे निद्रानाशाचेही कारण असू शकते. रात्री घाम येत असेल, स्वप्ने पडत असतील किंवा अस्वस्थ वाटत असेल तर हे रक्‍तातील साखर कमी झाल्याचे लक्षण आहे.

अचानक मूड बदलणे

अचानक मूड बदलणे हे रक्‍तातील साखर कमी झाल्याचे लक्षण असू शकते. आपल्या वर्तनात अचानक काहीतरी बदल झाला आहे, असे तुम्हाला जाणवले किंवा तुम्ही अस्वस्थ राहू लागलात तर हे ग्लुकोज कमी होण्याचे लक्षण असू शकते.

डोळ्यांसमोर अंधारी येणे

शरीरातील साखर कमी होण्याचे हे सर्वात पहिले आणि नेहमीचे लक्षण आहे. अनेकदा तुम्ही जर बराच वेळ उपाशी असाल आणि शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले तर तुम्हाला चक्‍कर येऊ लागते किंवा डोळ्यांसमोर अंधारी येते.

हायपोग्लायसेमियाशी निगडित मधुमेहाची औषधे

काही वेळा मधुमेहाच्या काही औषधांनीही रक्‍तातील साखर कमी होते. म्हणूनच ही औषधे घेताना त्यातील कोणती औषधे लो ब्लड शुगरशी निगडित आहेत, हे डॉक्टरांना विचारणे आवश्यक असते.

हायपोग्लायसेमियासाठी आहार

तुम्ही जर इन्सुलिन जास्त प्रमाणात घेत असाल तर रक्‍तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ शकते. त्याचबरोबर आहारातील इतर काही बाबीही साखरेचे प्रमाण कमी होण्यास कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, साधी साखर असलेले जेवण तुम्ही जेवलात, तुम्ही अपुरे जेवलात, नेहमीच्या वेळेपेक्षा उशिरा जेवलात किंवा जेवण न करता मद्यपान केले, तर रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते.

उपचार

तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्हाला आपल्या शरीरातील साखर कमी झाली आहे, असे वाटत असेल तर आधी रक्‍तातील साखरेचे प्रमाण तपासून घ्या.

रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास सर्वात प्रथम जलद गतीने सक्रिय होणारे कार्बोहायड्रेटस् किमान 15 ग्रॅम या प्रमाणात खा किंवा प्या. असे जलद गतीने सक्रिय होणारे कार्बोहायड्रेटस् असलेले पदार्थ –

– तीन ते चार ग्लुकोज टॅब्लेटस्
– ग्लुकोज जेलची एक ट्यूब
– चार ते सहा गोड लिमलेटसारख्या गोळ्या (शुगर फ्री नाही)
– अर्धा कप फळांचा रस
– अर्धा कप क्रीम दूध
– अर्धा कप शीतपेय (शुगर फ्री नाही)

– एक चमचा मध (हा मध जिभेखाली ठेवा, इथे ठेवल्याने मध वेगाने रक्‍तप्रवाहात मिसळतो.)
साखरयुक्‍त जेवण घेतल्यानंतर पंधरा मिनिटांनी रक्‍तातील साखरेचे प्रमाण तपासा. तुमच्यातील साखरेचे प्रमाण अजूनही 70 एमजी/डीएल असेल तर वर सांगितलेले पदार्थ पुन्हा खा. साखरेचा स्तर सामान्य होईपयर्र्त हे चालू ठेवा.

वाहन चालवू नका

वाहन चालवताना तुमच्यात तुम्हाला हायपोग्लायसिमाची लक्षणे दिसत असतील तर आपले वाहन रस्त्याच्या कडेला लावून आपली साखर तपासा.आणि गोड पदार्थ घ्या. प्रोटिन आणि कार्बोहायड्रेटयुक्‍त आहार घ्या.

इतर उपाय

– जेवण नियमितपणे आणि नियोजनबद्ध रीतीने करा.
– दिवसातून तीन वेळा योग्य अंतर ठेवून जेवण घेणे, शिवाय मधल्या काळात स्नॅक्सही खा.
– रोज 30 मिनिटे ते एक तास व्यायाम करा. व्यायामाआधी आणि व्यायामानंतर साखरेचे प्रमाण तपासा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– मद्यपान करू नका.

रक्‍तातील साखर कमी होणे याकडे फारसे लक्ष दिले जात नाही; पण याकडे वेळीच लक्ष दिले नाही ते धोकादायक ठरते.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT