Latest

Kitchen Tips : किचनमध्ये वस्तू खरेदी करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; पैसे वाचतीलच

मोहन कारंडे

– प्रतीक्षा पाटील

किचनमध्ये कितीही वस्तू असल्या, तरी महिलांना अनेक गोष्टी खरेदी करून आणाव्याशा वाटतात. विशेषत: नवं घर असेल, तर विचारूच नका! हे घे, ते घे… असं खरेदी करण्यापेक्षा मोजक्याच, पण गरजेच्या गोष्टी खरेदी केल्या, तर किचन नीटनेटकंही दिसेल आणि चार पैसेही वाचतील.

कोणत्याही घरात किचनवर होणारा खर्च मोठा असतो. आणि अर्थातच गरजेचाही असतो; पण कधी कधी आपण त्यावर अनावश्यकही खर्च करतो की काय, असे वाटते. काही घरांमध्ये किचन अगदी भरगच्च असतं. काही महिलांनाच ते हवं असतं. त्यांना किचन भरलेलं असल्याशिवाय घर भरल्यासारखं वाटत नाही. त्यातही मग वीज वाचवणारी, उच्चभ्रू वाटणारी किंवा कामचलाऊ किमतीतली… असे अनेक पर्याय आपल्यासमोर असतात. त्यातही आपला गोंधळ उडतो. मग कधी कधी नुसतीच खरेदी होत राहते. आधी निवडलेले काही पर्याय नंतर निरुपयोगी वाटू लागतात. मग आधीचा उत्साह मावळतो आणि घरात साहित्याची गर्दी होऊ लागते. त्यासाठी साहित्य घेतानाच काही गोष्टींची काळजी घेतली, तर आपले पैसे वाचतीलच; पण किचन सुटसुटीत असल्याने मनही प्रसन्न राहील.

Kitchen Tips : तुम्हाला काय हवंय ते आधी ठरवा

आपलं घर कसं आहे, त्यावर त्यातल्या किचनच्या गोष्टी ठरवता आल्या पाहिजेत. त्यानंतर आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत, यांचाही विचार करता आला पाहिजे. या सार्‍यांचा ताळमेळ बसला की मग खरेदीचा विचार केला पाहिजे. बर्‍याचदा आपलं किचन लहान असतं आणि आपण मात्र मोठा फ्रीज, मोठ्या वस्तू खरेदी करण्याचा अट्टहास करतो. खरंतर त्याआधीही याचा विचार करायला हवा की आपली आधीची घरातली वस्तू खरंच खराब झाली आहे का, ती दुरुस्त करून आणणे शक्य आहे का? तसे असेल, तर नव्याची गरज राहणार नाही. अनेकदा जुन्या वस्तूत काहीही बिघाड नसतो, तरीही काही गोष्टी त्यात कमी आहेत, म्हणून आपण ती टाकून नव्या वस्तूंचा अट्टहास धरतो; पण त्यावेळी हा विचार करावा की खरंच जुन्या वस्तूत कमी असलेल्या गोष्टींची आपल्याला गरज आहे? काही वस्तूंच्या रंगांबाबतही आपण फार आग्रही असतो आणि मग त्या हट्टापायी जास्त रक्कम दुकानात घालवून बसतो. त्यामुळे खरेदीपूर्वी घरीच सारासार विचार करा.

Kitchen Tips : घरातल्या जागेचा अंदाज घ्या

वस्तू खरेदी करायचं ठरल्यावर तुम्ही तिला घरात कुठे ठेवणार आहात, त्याचा अंदाज घ्या. त्या जागेचं माप घ्या. तिथे ती बसेल का, याचा विचार करा. कारण तुमच्या घरातल्या त्या जागेचं माप आणि नव्या वस्तूचं माप मॅच होईलच असं नाही. कारण जुन्या वस्तूचं माप आणि नव्या वस्तूचं माप भिन्न असू शकतं. किंबहुना विविध मॉडेलनुसार आता आकारांतही बदल झाले आहेत. त्यामुळे दुकानात जाताना माप बरोबर घेऊन जा.

Kitchen Tips : आधी ऑनलाईन माहिती घ्या

जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे, त्याची शक्य असेल, तर आधी ऑनलाईन माहिती घ्या. विविध कंपन्यांची उत्पादने त्यावर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यावरून अंदाज आल्याने दुकानात त्याचा तुम्हाला उपयोग होईल. कारण मोठ्या दुकानांत विविध कंपन्यांचे चक्रावून सोडणारे पर्याय असतात. त्याची माहिती आधीच तुम्हाला असली, तर फसवले जाण्याची किंवा चुकीचा पर्याय निवडण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही.

Kitchen Tips : प्रत्यक्ष खरेदी करताना…

तुम्ही प्रत्यक्ष खरेदी करताना तुमच्या लक्षात येईल की तुमच्या अपेक्षेप्रमाणे खूपच कमी निवड करण्याची संधी तुम्हाला आहे. तरीही त्यातून अधिकाधिक फिचर्स असलेल्या, चांगली सेवा देणार्‍या व वस्तू खराब झाल्यास परतावा किंवा बदलून देणार्‍या कंपनीच्या वस्तूलाच तुम्ही प्राधान्य द्या. यामुळे तुमचा भविष्यातला मनस्ताप वाचेल.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT