Latest

कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणावरून वादात सापडलेले कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा देणार राजीनामा

अमृता चौगुले

बंगळूर; पुढारी ऑनलाईन : कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणावरून वादात सापडलेले कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा (ks eshwarappa) शुक्रवारी राजीनामा देणार आहेत. गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना ईश्वरप्पा म्हणाले, 'उद्या मी मुख्यमंत्र्यांना माझा राजीनामा सुपूर्द करणार आहे. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो." कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ईश्वरप्पा मंत्रिपदी कायम राहतील, असे विधान केल्या नंतर काही तासांनंतर ईश्वरप्पा यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले होते, "पोस्टमॉर्टम झाले आहे. प्राथमिक तपास सुरू करू द्या. या तपासणीच्या निकालाच्या आधारे आम्ही पुढील कारवाई ठरवू." मात्र, पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी ईश्वरप्पा (ks eshwarappa) यांना राजीनामा द्यावा लागेल, अशा स्पष्ट सूचना भाजप हायकमांडने राज्य सरकारला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

विशेष म्हणजे बोम्मई सरकारचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वरप्पा (ks eshwarappa) यांच्यावर संतोष पाटील या कंत्राटदाराने 'कमिशन' मागितल्याचा आरोप केला होता. पाटील यांनी मंगळवारी आत्महत्या केली. उडुपी येथील एका खाजगी लॉजच्या खोलीत संतोष पाटील यांचा मृतदेह आढळून आला. या कंत्राटदाराने एका व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या मेसेजमध्ये त्यांनी ईश्वरप्पा आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसने ईश्वरप्पा (ks eshwarappa) यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. स्वतःला भाजपचा कार्यकर्ता म्हणवून घेणाऱ्या पाटील यांनी ३० मार्च रोजी आरोप केले होते. त्यांनी आरडीपीआर विभागात एक काम केले होते. त्या कामाचा मोबदला मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. पण, मंत्री ईश्वराप्पा यांनी ४ कोटी कामामध्ये ४० टक्के कमिशनची मागणी केली होती. यानंतर कंत्राटदाराने आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या मृत्यूला ईश्वराप्पा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी ईश्वरप्पा यांच्याविरुद्ध उडुपी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या भावाने मंत्र्याविरोधात तक्रार दाखल केली होती. ईश्‍वरप्पा यांचे दोन सहकारी बसवराज आणि रमेश यांचेही एफआयआरमध्ये नावे आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT