

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळ अभिनेता जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजेच थलपथी विजय (Thalapathy Vijay) प्रमोशन आणि मीडियापासून दूर राहतो. पण, यावेळी त्यांने आपला नियम बदलला आणि तब्बल १० वर्षांनी मुलाखत दिली. याआधी त्याच्या शेवटच्या मुलाखतीवर बराच गदारोळ झाला होता आणि या वादामुळे त्याने पुन्हा दुसरी मुलाखत दिली नाही. मात्र यावेळी त्याने नुकत्याच आलेल्या 'बीस्ट' (Beast) चित्रपटासाठी हा नियम बदलला. या दुर्मिळ मुलाखतीने केवळ दक्षिणेतच नव्हे तर देशभरात अनेक बातम्या निर्माण केल्या. अभिनेता विजयला या मुलाखती दरम्यान विचारण्यात आलेल्या त्याचे अनेक वाद, चित्रपटांचे प्रदर्शन आणि राजकारणात सामील होण्याच्या प्रश्नांना त्याने अत्यंत मुस्सद्दीने उत्तरे दिली.
थलपथी विजय (Thalapathy Vijay) याने बीस्टचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांना ही मुलाखत दिली. ४८ मिनिटांच्या या मुलाखतीच्या सुरुवातीलाच दिग्दर्शकाने विजयला विचारले की, तू १० वर्षे मुलाखतीपासून दूर राहण्याचे कारण काय? तुमच्याकडे वेळ नव्हता की दुसरे काही कारण होते ? यावर विजय म्हणाला, ही काही काळाची बाब नाही. मी इतका व्यस्त माणूस नाही. मी मुलाखतीसाठी वेळ देऊ शकलो असतो पण १०-११ वर्षांपूर्वी एक अपघात झाला. हे सर्वात मोठे कारण आहे. मी काही गोष्टी अशा पद्धतीने बोलल्या होत्या की तेव्हापासून मी खबरदारी घ्यायला सुरुवात केली.
जेव्हा मी माझी ती १० वर्ष जुनी मुलाखत वाचली तेव्हा मला वाटले की हा मी नाही. खऱ्या आयुष्यात मी तसा नव्हतो. माझ्या लक्षात आले की मी जे बोललो ते पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने प्रकाशित झाले आहे. जे मी नव्हतो. मग मला वाटले की मी लोकांसमोर गोष्टी स्पष्ट कराव्यात.
तुला राग येतो का ? या प्रश्नावर विजयने सांगितले की, मला राग येतो पण, मला पुन्हा वाटते की जेव्हा तुम्ही ती संधी गमावली असेल तेव्हा डोळ्यात पाणी येऊन काय उपयोग. असे केल्यास नवीन संधीही धुसर होईल आणि ती संधीही आपल्या हातून दूर होईल. म्हणूनच 'टेक इट इझी, मेक इट इझी'.
धर्म आणि देवाबाबत विजयने सांगितले की, त्याची आई हिंदू आणि वडील ख्रिश्चन आहेत. मी सर्वत्र मंदिर, दर्गा आणि चर्चमध्ये जातो. तू या ठिकाणी जाऊ नकोस, या ठिकाणी जाऊ नकोस असे मला कोणी सांगितले नाही. मी माझ्या मुलांनाही तेच सांगितले आहे.
थलपथी विजयची ही गोष्ट प्रत्येक चाहत्यांच्या हृदयाला भिडली थलपती विजयने वडील एसए चंद्रशेखर यांच्याबाबतही उत्तर दिले. ते म्हणाले की, देव आणि पिता यात फरक आहे. आपण देव पाहू शकत नाही, परंतु आपण पित्याला पाहू शकता.
विजय राजकारणात प्रवेश करणार की नाही अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. तर या मुलाखतीत त्याने या प्रश्नाचे उत्तरही दिले. राजकारणात पाऊल ठेवणं हे आपल्या चाहत्यांच्या इच्छेवर अवलंबून असल्याचं तो म्हणाला. मी नेता व्हावे अशी त्यांची इच्छा असेल तर मी ती गोष्ट नक्कीच पूर्ण करेन.
2021च्या निवडणुकीत विजय सायकलवरून मतदान करण्यासाठी आला होता. यावरूनही बराच गोंधळ झाला. राजकारणासाठी विजयने हे कृत्य केल्याचा आरोप काही लोकांनी केला होता. याला उत्तर देताना विजय म्हणाला, या गोष्टीला विनाकारण महत्त्व देण्यात आले. ज्या ठिकाणी मतदान केंद्र होते ते माझ्या घरापासून जवळच्या अंतरावर होते. मी घरातून बाहेर पडलो आणि मुलाची सायकल पाहून विचार केला की, जवळच जायचे आहेत तर सायकलवरुन जावूया. यामुळेच मी सायकलवरुन मतदान केंद्रावर पोहचलो.