Latest

‘विराट तू क्रिकेटपेक्षा मोठा नाहीस’, Kapil Dev यांनी विराटला फटकारले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kapil Dev : दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या कर्णधारपदाबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांवर सर्व काही स्पष्ट केले. यादरम्यान त्याने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कर्णधारपदावर दिलेले विधान चुकीचे असल्याचे म्हटले.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारतीय वनडे क्रिकेट संघाचा कर्णधार बदलण्यात आला. त्यानंतर वाद निर्माण झाले. एकामागून एक अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर अखेर खुद्द कोहलीने पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत कोहलीने सांगितले की, कर्णधारपदावरून हटण्यापूर्वी मला याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. तसेच टी-20 चे कर्णधारपद सोडल्याचे सांगितल्यानंतर माझा राजीनामा सहजपणे स्विकारण्यात आला.

टीम इंडियाचे माजी भारतीय कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या एकदिवसीय कर्णधारपदाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, 'विराटला वनडे कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी मिळून घेतला आहे. बीसीसीआयने विराटला टी-20 चे कर्णधारपद सोडू नये असे सांगितले होते, पण तो मान्य झाला नाही. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये दोन वेगळे कर्णधार नसावेत, असे निवडकर्त्यांचे मत होते. त्यामुळे विराटला हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. आता विराट कसोटी कर्णधार राहणार असून रोहित वनडे, टी-२० संघांचा कर्णधार राहील.'

त्यानंतर विराट कोहलीने बुधवारी पत्रकार परिषदेत म्हटले की, 'मी बीसीसीआयला सांगितले की मला टी-20 चे कर्णधारपद सोडायचे आहे. जेव्हा मी माझा निर्णय बीसीसीआय समोर संगितला तेव्हा त्यांनी तो सहजपणे स्वीकारला. त्यांनी मला तुझा निर्णय मागे असं सांगितले नाही.'

दरम्यान, १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी विराटला बुधवारच्या पत्रकार परिषदेवरून चांगले फटकारले आहे. आज त्यांनी प्रतिक्रिया देत कोहलीला सूचना केल्या. ते म्हणाले की, निवडकर्त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि ते कुणालाही सांगण्यास बांधील नाहीत. निवडकर्त्यांनी कोहलीसारखे क्रिकेट खेळले नसेल, पण त्यांना टीम इंडिया क्रिकेटच्या कर्णधारपदावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. निवडकर्त्यांनी त्यांचे निर्णय कळवायला बांधील असावे अशी अपेक्षा खेळाडूंनी कधीही करू नये. विराट कोहली हा महान क्रिकेटर असून या वादाचा त्याच्या खेळावर आणि कर्णधारपदावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, माजी कार्णधार कपिल देव (Kapil Dev) म्हणाले की, कोणत्याही खेळाडूने बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध बोलणे योग्य नाही. जेव्हा मला कर्णधारपदावरून हटवण्यात आले तेव्हा मी खूप दुखावलो गेलो होतो. पण तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करत आहात हे विसरून चालणार नाही, हेही तितकेच खरे आहे.'

दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्याबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्याचवेळी निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी कोहलीने केलेले वक्तव्य धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.

सिंग म्हणाले की, 'खेळाडूंची निवड करणे आणि कर्णधाराची नियुक्ती करणे हे निवड समितीचे काम आहे. निवड प्रक्रियेत बीसीसीआयची कोणतीही भूमिका नाही. विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य खूपच धक्कादायक होते. त्याने हे करायला नको होते. वैयक्तिकरित्या, मला वाटते की वनडे आणि टी २० संघांसाठी दोन कर्णधार नसावेत. ही गोष्ट अधिक व्यावसायिकपणे हाताळायला हवी होती आणि विराट कोहलीला आधी सांगायला हवी होती. माझा मुद्दा एवढाच आहे की या बाबी सोडवायला हव्यात कारण त्यामुळे भारतीय क्रिकेटचे नुकसान होऊ शकते.'

SCROLL FOR NEXT