Latest

जुन्नरचे आमदार ‘नॉट रिचेबल’; कार्यकर्ते संभ्रमात

अमृता चौगुले

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतल्या बंडानंतर जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नक्की कोणासोबत जावे? हा प्रश्न पडला असून, तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांची भूमिका स्पष्ट न झाल्याने व त्यांचा फोन दिवसभर 'स्विच ऑफ' असल्याने तालुक्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

दरम्यान, जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे यांनी तरुण पिढीला घेऊन मुंबई येथे शरद पवार यांच्या सभेला हजेरी लावून आपला पाठिंबा दर्शविला आहे. तालुक्यातील जुने जाणकार, ज्येष्ठ नागरिक शरद पवार यांच्याच बाजूने असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारी यांनी आपली भूमिका सर्वांना एकत्र बसूनच घेऊ, असाच ठेका लावून धरला आहे.

आ. बेनके यांनी आपण कोणासोबत जाणार? हे अद्याप स्पष्ट केले नसल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रयत्नांतून जुन्नर तालुक्यात अनेक विकासकामे झाली असून, तालुक्याचा महत्त्वाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, तरुण फळी शरद पवार यांच्या विचारांना मानणारी आहे.

अशा परिस्थितीत आमदार अतुल बेनके हे अजित पवार गटासोबत गेल्यास तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊन शरद पवार यांना मानणारा वर्ग, त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे तालुक्याचे नेतृत्व करणारे माऊली खंडागळे, तर काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर हे एकत्र येऊन काय निर्णय घेतील? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, एकंदरीत या घडामोडीतून अतुल बेनके यांचा निर्णय अजित पवार यांच्या गटाबरोबर जाण्याचे निश्चित झाल्यास तालुक्याला विधानसभेसाठी नवीन चेहरा मिळणार, असेच चित्र निर्माण झाले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT