Latest

Jejuri Khandoba Temple : जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा गाभारा दर्शनासाठी खुला

अमृता चौगुले

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेजुरीच्या खंडोबा देवाचा गाभारा भाविकांना दर्शनासाठी शनिवार (दि. 21) पासून खुला करण्यात आला. जेजुरीतील मर्दानी दसर्‍याची श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने तयारी पूर्ण झाली असल्याचे पत्रकार परिषदेत देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी सांगितले. या वेळी विश्वस्त अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे, अ‍ॅड. अनिल सौदडे, विश्वास पानसे, व्यवस्थापक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.

या वेळी खोमणी यांनी सांगितले, की श्री खंडोबा मंदिरात शासनाच्या वतीने तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविला जात आहे. दि. 29 ऑगस्टपासून मुख्य मंदिरातील गाभारा व सभामंडपाचे डागडुजीचे काम सुरू होते. त्यामुळे देवाचा गाभारा भाविकांना दर्शनासाठी बंद होता. शनिवारपासून हा गाभारा भाविकांना खुला करण्यात आला आहे. तसेच, जेजुरीचा मर्दानी दसरा राज्यात प्रसिद्ध असून, या दसरा उत्सवानिमित्त संपूर्ण गड, तसेच रमणा डोंगर पालखी मार्गावर आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

दसरा पालखी मार्गाची डागडुजी करण्यात आली आहे. देवभेटीच्या रमणा परिसरात दसर्‍याला आकर्षक हवाई फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी जेजुरी गडावर तलवार उचलणे व कसरत करण्याची स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी विजेत्यांना गौरव चिन्हे व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. देवाचे मानकरी, पालखी सोहळ्यातील खांदेकरी, कलावंत, नित्य सेवेकरी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या दसरा सोहळ्यात भाविकांना अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापन चोख ठेवण्यात आल्याचे प्रमुख विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी सांगितले. जेजुरी गडावरील खंडा रशर्यतीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपअधीक्षक तानाजी बरडे उपस्थित राहणार असल्याचे विश्वस्त अ‍ॅड. पांडुरंग थोरवे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT