पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स आणि गाणीही रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर या चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. मात्र, रेड चिलीज एंटरटेनमेंटने किंग खानच्या 'जवान' चित्रपटाच्या काही क्लिप 'चोरी' झाल्या आणि ऑनलाइन लीक झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. (Jawan Clips Stolen)
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, माहिती प्रसारण तंत्रज्ञानाअंतर्गत मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात आज (दि. १०) गुन्हा नोंदवण्यात आला होता. एफआयआरमध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंटने 'जवान' क्लिप कॉपीराइटचे उल्लंघन करून ऑनलाइन शेअर केल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओ लीक करणाऱ्या पाच ट्विटर हँडल्सची ओळख पटली असून त्यांना कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. मात्र, केवळ एका ट्विटर अकाऊंटने ही नोटीस मान्य केली आहे. (Jawan Clips Stolen)
जवान चित्रपटाच्या क्लिप ऑनलाइन लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी एप्रिलमध्येही दिल्ली उच्च न्यायालयाने 'जवान'चे लीक झालेले व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटने न्यायालयात दावा याबाबत दावा केला होता. (Jawan Clips Stolen)
'जवान'च्या शूटिंग दरम्यानही रेड चिलीज एंटरटेनमेंटने सेटवर मोबाईल फोन आणि रेकॉर्डिंग करण्याऱ्या उपकरणांवर बंदी घातली होती. एटली यांनी शाहरुख खानच्या 'जवान'चे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा आणि रिद्धी डोगरा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दीपिका पदुकोणनेही 'जवान'मध्ये खास भूमिका केल्याचे बोलले जात आहे. 'जवान' यावर्षी ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. (Jawan Clips Stolen)