पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशमध्ये १०० कोटी रुपये खर्च करुन संत रविदास मंदिर बांधण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.१२) या मंदिराचे भूमीपूजन केले. हे मंदिर मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास मेमोरियल स्थळ या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. आज पंतप्रधान मोदी यांनी संत रविदास यांना पुष्पहार अर्पन करुन अभिवादन केले. (Sant Ravidas Temple)
संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास मेमोरियल स्थळ हे ११.२५ एकरांमध्ये १०० कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणार आहे. या भव्य मेमोरियलमध्ये संत रविदास यांच्या आयुष्याबद्दल माहिती, संत रविदास यांचे यांचे तत्वज्ञान आणि त्यांची शिकवण याबद्दल भाष्य करणारे संग्रहालय बांधण्यात येणार आहे. शिवाय, संत रविदास यांच्या मंदिराला भेट देण्यास येणाऱ्या भक्तांसाठी भोजनालय देखील बांधण्यात येणार आहे. याबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी फेब्रुवारी महिन्यात घोषणा केली होती. (Sant Ravidas Temple)
संत रविदासांचे भाषण, त्यांचे कार्य, सामाजिक योगदान, भक्ती चळवळीतील संत रविदासांची भूमिका आदी विषयांचे आधुनिक तंत्राने कलात्मक चित्रण करण्यात येणार आहे. शिवाय, या ठिकाणी १२,५०० चौरस फुटांचे भक्त निवास बांधण्यात येणार आहे. जगभरातून येणारे साधक, भक्त, संशोधक, अभ्यासक, प्रवासी यांच्या निवासासाठी हा परिसर बनवला जाणार आहे. पंधरा खोल्या असतील ज्यात एसी रूम, स्वच्छ बेड, अटॅच्ड बाथरूम असतील. पन्नास जणांसाठी वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध असेल. (Sant Ravidas Temple)