Latest

Jasprit Bumra : बुमराह होणार टीम इंडियाचा कर्णधार!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumra : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारताला 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात हार्दिक पंड्यासह सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अशा स्थितीत, भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे क्रिकबजच्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होणार असून तो संघाचा कर्णधार होऊ शकतो.

आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. वास्तविक, विंडीज दौऱ्यानंतर एका शिबिराचे आयोजन केले जाणार असून आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या सर्व खेळाडूंनी या शिबिरात सहभागी व्हावे, अशी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची इच्छा आहे. या प्रकरणात अपवाद जसप्रीत बुमराह असू शकतो, ज्याची भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते टी-20 सामन्यांमध्ये चाचणी घेऊ इच्छितात. बुमराह 10 महिन्यांच्या दुखापतीच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत आहे. दुखापतीदरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती.

खरं तर, द्रविडने आशिया चषक स्पर्धेच्या तयारीसाठी बंगळूरमध्ये एक आठवडाभर शिबिर घेण्याचा सल्ला दिला आहे. 6 संघांच्या आशिया चषक स्पर्धेसाठी संघ श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी 24-25 ऑगस्ट रोजी शिबिर सुरू होण्याची शक्यता आहे. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 2 सप्टेंबरला होणार आहे.

विंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज

भारतीय संघ बार्बाडोसला पोहोचला आहे, जिथे 27 आणि 29 जुलै रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध तीन पैकी दोन एकदिवसीय सामने खेळणार आहे. या संघात पंड्या, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि उमरान मलिक यांचा समावेश आहे. यशस्वी जैस्वाल वगळता कसोटी संघातील आर अश्विन, अजिंक्य रहाणे आणि नवदीप सैनी हे खेळाडू भारतात रवाना झाले आहेत. जैस्वाल टी-20 संघाचा भाग असल्याने तो येथेच थांबला आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2023 दरम्यान खेळवली जाणार आहे.

SCROLL FOR NEXT