पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचे मार्चपर्यंतचे होम कॅलेंडर बीसीसीआयने नुकतेच जारी केले आहे. यानुसार टीम इंडिया सप्टेंबर ते मार्च दरम्यान 16 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यामध्ये 5 कसोटी, 3 वनडे आणि 8 टी-20 सामन्यांचा समावेश आहे.
भारताच्या होम कॅलेंडरची सुरुवात सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यापासून होईल. ही मालिका 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे खेळणार आहे. विश्वचषकानंतर 23 नोव्हेंबरपासून 5 टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेनंतर अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे संघ जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहेत.
अमिताभ विजयवर्गीय, जयेंद्र सहगल आणि हरी नारायण पुजारी यांचा समावेश असलेल्या बीसीसीआयच्या तांत्रिक समितीने या सामन्यांसाठी वेगवेगळी ठिकाणेही निश्चित केली आहेत. यात समितीने मोठ्या शहरांतील मैदानांऐवजी इतर लहान शहरातील मैदानांना प्राधान्य दिले आहे. होम कॅलेंडरनुसार, टीम इंडियाला 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, परंतु हे सर्व सामने मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि बंगळूरसारख्या मोठ्या शहरातील मैदानांवर होणार नाहीत. त्या ऐवजी हैदराबाद, विझाग, राजकोट, रांची आणि धर्मशाला येथील मैदानांवर लढती होणार आहेत.
टीम इंडियाचा होम सीझन 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये पहिला वनडे सामना खेळणार आहे. दुसरा आणि तिसरा वनडे सामना अनुक्रमे 24 आणि 27 सप्टेंबर रोजी इंदूर आणि राजकोटमध्ये खेळवला जाईल.
वनडे विश्वचषक पार पडल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे, जी 23 नोव्हेंबरपासून 3 डिसेंबरपर्यंत चालेल. या मालिकेतील सामने विझाग, त्रिवेंद्रम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे खेळवले जाणार आहेत.
टीम इंडियाच्या नवीन वर्षाची सुरुवात 11 जानेवारीला अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याने होणार आहे. हा सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. या टी-20 मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारत दौ-यावर येणार आहे. उभय संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे.