Latest

जळगाव : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नारा “तारीख तेरा, मतदान मेरा”

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या अंतर्गत येणाऱ्या जवळपास 75 महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी "तारीख तेरा,मतदान मेरा" हे घोषवाक्य म्हणून मतदार जनजागृतीचा कार्यक्रम एकाच वेळी घेतला. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आले. त्यामुळे महाविद्यालयाचे कॅम्पस मध्ये निवडणूकीबाबत चैतन्य पसरले आहे.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा निवडणूक स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्ह्याचे समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांची ऑनलाइन बैठकीचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने नुकतेच "तारीख तेरा,मतदान मेरा" या कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्वांना युवा शक्तीला मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभागी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे हा मानस कार्यक्रमातून सफल झाला.

कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलसचिव विनोद पाटील साहेब, रासेयो प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना मतदानाची शपथ दिली. राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे यांनी "तारीख तेरा मतदान मेरा" हे घोषवाक्य म्हणून युवा मतदारांमध्ये चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमास डॉ. संजय पाटील, विभागीय समन्वयक प्रा योगेश पुरी डॉ. गोपाल निंबाळकर डॉ. बिजवस्नी, आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT