जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शेतीमालाला भाव नाही दडपशाही, जुलूमशाही, फेकूपणा हे सरकारचे आश्वासन आहे. जिल्ह्यात बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत. सत्ता सोडून आपण सत्यासोबत आल्यामुळे नागरिकांनी कौतुक केले आहे. त्यांच्या अशा अत्याचारांना सर्वसामान्य नागरिकांना बळी पडू द्यायचे नाही असे वक्तव्य जळगावमधून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेले करण पवार यांनी आघाडीच्या मेळाव्यात केले.
आघाडीच्या मेळाव्याप्रसंगी बोलताना करण पवार म्हणाले, विकासाच्या बाबतीत विचार केला तर नुकतेच अमळनेरमध्ये भाजपा उमेदवाराने सांगितले की, त्यांनी साडेतीन कोटी रुपयांची शेतकऱ्यांची कामे करून दिली. तितकी तर येथील लोकसंख्या नाही. मग यांनी कामे कोणाची केली? असा प्रश्न करण पवार यांनी उपस्थित केला. उगाच काही बोलू नका अभ्यास करा मग बोला असा टोलाही त्यांनी भाजपाचे उमेदवार स्मिता वाघ यांना यावेळी लगावला.
सरकारच्या चुकीच्या धाेरणांमुळे उद्योगांचे कंबरडे मोडले आहे. भाजप जिंकून येईल ही मानसिकता दूर केली पाहिजे. जनतेचा दबलेला आवाज मोकळा करण्याची संधी मिळालेली आहे. आपापल्या गावातील बूथ सांभाळा म्हणजे आपला नक्कीच विजय होणार. गेल्या काळात जळगाव लोकसभेमध्ये भाजपा व शिवसेनेच्या युतीमुळे भाजपचे सीट आलेले आहेत. याबाबतच्या मताधिक्याचा विचार केला तर त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेनेची मते आहेत. त्यामुळे यावेळेसही ती मते वजा केल्यास काय होईल? याचाही विचार करावा लागेल. असे पवार म्हणाले.
हेही वाचा: