गणेशखिंड रस्ता घेणार मोकळा श्वास; रुंदीकरणाचा मार्ग मोकळा | पुढारी

गणेशखिंड रस्ता घेणार मोकळा श्वास; रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मेट्रोमार्ग आणि दुमजली उड्डाणपुलासाठी गणेशखिंड रस्तारुंदीकरणात बाधित वृक्षासंदर्भातील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली असून, बाधित 72 झाडांचे पुनर्रोपण करण्याचे व त्यासंबंधीचा अहवाल देण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. यामुळे गणेशखिंड रस्तारुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गणेशखिंड रस्त्यावर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम पीएमआरडीएच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत गणेशखिंड रस्त्यावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी असल्याने महापालिकेने विकास आराखड्यानुसार हा रस्ता 45 मी. रुंद करण्याचे काम हाती घेतले आहे. रुंदीमुळे बाधित होणार्‍या मिळकतींचा ताबा घेऊन रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. परंतु याठिकाणी असलेली झाडे काढण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केल्याने मागील सहा महिन्यांहून अधिक काळ हे काम रखडले होते.

त्यामुळे काम सुरू असताना अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरून वाहतूक सुरू ठेवावी लागत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, रस्ता रुंदीकरणात बाधित झाडे काढण्याचे काम सुरू असताना पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केला. महापालिकेने ही झाडे काढताना तांत्रिक प्रक्रिया राबविली. यावर आक्षेप घेतलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकून न घेता एकतर्फी सुनावणीची प्रक्रिया उरकून झाडे काढण्यास सुरुवात केल्याचा आरोप करत परिसर संस्थेने महापालिकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तज्ज्ञांची समिती नेमून अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार तज्ज्ञांची समिती नेमून समितीने तयार केलेला अहवाल बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला. त्यानंतर न्यायालयाने या रस्त्यावरील काढाव्या लागणाऱ्या 72 झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या अटीवरच स्थगिती उठविली, अशी माहिती महापालिकेच्या विधी अधिकारी अ‍ॅड. निशा चव्हाण यांनी दिली. न्यायालयातील सुनावणीस अ‍ॅड. चव्हाण यांच्यासह पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर आणि याचिकाकर्ते रणजीत गाडगीळदेखील उपस्थित होते. या झाडांचे पुनर्रोपण करून त्याचा अहवालदेखील सादर केला जाईल, असे प्रतिज्ञापत्र घेतल्यानंतरच न्यायालयाने स्थगिती उठविली.

हेही वाचा

Back to top button