मुंबई : पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष कुख्यात डॉन अरुण गवळी यांच्या मतांवर डोळा ठेवत, भाजपचे दक्षिण मुंबई लोकसभेतील संभाव्य उमेदवार राहुल नार्वेकर यांनी थेट गवळी यांची कन्या गीता हिला मुंबईच्या महापौर पदाची उमेदवार म्हणून घोषित केले. त्यामुळे विरोधकांसह भाजपातील नेते व कार्यकर्तेही चक्रावले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर कुख्यात डॉन अरुण गवळी यांच्या सुटकेचा कोणाला फायदा होणार, अशी चर्चा रंगलेली असताना एका प्रचार सभेत भाजपचे नेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गवळी यांची कन्या गीताला महापौर पदाची उमेदवारी म्हणून घोषित केले. त्यामुळे नागपूर तुरुंगातून सुटका होताच तो आपल्या दगडी चाळीतून लोकसभेसह पुढील सर्व निवडणुकांत सक्रिय होईल, असे संकेत नार्वेकर यांच्या या घोषणेतून मिळतात. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला की भाजपच्या वाट्याला येणार हे अद्याप ठरलेले नसताना, हा मतदारसंघ भाजपच्याच वाट्याला येणार हे गृहीत धरून राहुल नार्वेकर यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.
आपल्या प्रचाराची सुरुवात त्यांनी दगडी चाळीच्या प्रभावक्षेत्रातील भायखळ्यापासून केली. 14 एप्रिल रोजी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये झालेल्या प्रचारसभेत थेट दगडी चाळीशी नाते जोडत नार्वेकर यांनी मी विधानसभा अध्यक्ष असून माझे अधिकार मला माहिती आहेत. त्यामुळे, मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच अ. भा. सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय असे समजा. या बहिणीला भावाची साथ निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठी नाही, तर त्या मुंबईची महापौर होईपर्यंत राहील, असेही वक्तव्य नार्वेकर यांनी केले. गीता गवळी यांना मुंबईच्या महापौरपदाच्या उमेदवार घोषित करणारा राहुल नार्वेकर यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नार्वेकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यामुळे त्यांची ही घोषणा भाजपचीच मानली जात असल्याने मुंबईच्या राजकारणात ती चर्चेचा विषय झाली आहे.
कायदेशीर सल्ला घेणार !
राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असून ते एक संवैधानिक पद आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची घोषणा करू शकत नाहीत. अशा प्रकारचे आमिष दाखवणे म्हणजे निवडणूक आचारसंहिता भंग आहे. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ.
– अजय चौधरी, आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आधी निवडून तर या…
विधानसभा अध्यक्ष यांनी अशा प्रकारची घोषणा करणे चुकीचे आहे. मुळात नार्वेकर हे उमेदवारही नाहीत. आम्हाला एवढेच सांगायचे आधी मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून तर या… मग आमिष दाखवून लोकसभेला मत घ्या.
– संदेश कोंडविलकर, उपाध्यक्ष, मुंबई प्रदेश काँग्रेस
हेही वाचा :