तेहरान / तेल अवीव / वॉशिंग्टन / नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एक एप्रिल रोजी सीरियातील इराणी दूतावासालगतच्या इमारतीवर इस्रायलने क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्यात इराणच्या दोन मुख्य लष्करी कमांडर्ससह 13 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा सूड घेतला जाईल, असा इशारा इराणने इस्रायलला दिला होता. अखेर आज (दि.13) इराणच्या नौदलाने ओमानच्या समुद्रातून जात असलेले इस्रायलच्या जहाजावर लष्करी कारवाई करून ताब्यात घेतले. यावेळी हेलिकॉप्टरमधून इराणी नौदलाचे कमांडो जहाजावर उतरले. जहाजातील सर्वांना ओलिस ठेवण्यात आले आहे. (Israel vs Iran)
इराणने शंभरावर क्रूझ क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने रोखलेली आहेत. इराण कुठल्याही क्षणी इस्रायलवर हल्ला करेल, असे सांगण्यात येत आहे. इस्रायलनेही लष्करी तयारीला वेग दिलेला आहे. अमेरिकेने आपली युद्धनौका इस्रायलच्या दिमतीला रवाना केली आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार अमेरिकेचे विमानवाहू जहाज यूएसएस ड्वाईट आयझनहॉवर लाल समुद्रमार्गे इस्रायलला येत आहे.
इराणच्या संभाव्य क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांपासून इस्रायलचा ते बचाव करेल. आकाशात साचलेले युद्धाचे ढग बघता भारतासह अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, जर्मनीने आपापल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. इराण तसेच इस्रायलला न जाण्याची सूचना या देशांनी आपापल्या नागरिकांना केली आहे. मध्यपूर्वेतील आठ देशांतून अमेरिकन लष्कर तैनात आहे. युद्धाची स्थिती उद्भवल्यास हे लष्कर इस्रायलच्या बाजूने उभे राहील. (Israel vs Iran)
न्यूज 18 च्या वृत्तानुसार इराणने ताब्यात घेतलेले इस्रायलचे जहाज मुंबईला येऊ घातलेले होते. एमएससी एरिज असे या जहाजाचे नाव असून, त्यात 20 क्रू मेंबर्स आहेत. हे सर्वजण फिलिपाईन्सचे नागरिक आहेत. जहाजावर पोर्तुगालचा झेंडा असला तरी लंडनमधील एका कंपनीच्या ते मालकीचे आहे. या कंपनीत इस्रायली उद्योगपती इयाल ओफेर यांचा मोठा हिस्सा आहे.
इराणने इस्रायलवर हल्ला करू नये, ही आमची विनंती आहे. याउपर इराणने तसे केलेच तर आम्हीही इस्रायलचे संरक्षण करूच आणि इराणला मग कुणीही वाचवू शकणार नाही.
हेही वाचा :