Latest

मोदींच्या रूपाने देशात नवा पुतीन तयार होतोय का?: शरद पवारांनी व्यक्त केली चिंता 

अविनाश सुतार
अमरावती, पुढारी वृत्तसेवा:  रशियामध्ये ज्याप्रकारे व्लादिमीर पुतीन यांच्या हाती सत्ता सूत्रे एकवटली आहेत. त्याच प्रकारे मोदींच्या रूपाने देशामध्ये नवा पुतीन तयार होतोय का, अशी चिंता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी अमरावतीत सोमवारी (दि.२२) व्यक्त केली. काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी सांस्कृतिक भवन येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख आदी उपस्थित होते. Sharad Pawar on PM Modi
 ते म्हणाले की, या देशातील संसदीय लोकशाही संकटात जाईल, असे चित्र दिसते आहे. गेल्या दहा वर्षांपासून मी मोदींचा कारभार बघतो आहे. त्यांची भाषणे ऐकतो आहे. मी अनेकांसोबत काम केले आहे. राजीव गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत. जवाहरलाल नेहरू नंतरच्या सर्व प्रधानमंत्र्यांची काम करण्याची पद्धत आम्ही पाहिली आहे. आतापर्यंतच्या प्रधानमंत्र्यांनी नवा भारत निर्माण करण्याचा संदेश दिला. मात्र, आजचे प्रधानमंत्री हे काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करतात. त्यांच्याविषयी चुकीची माहिती पसरवितात. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांमध्ये देखील मोदींची दहशत आहे. सत्ताधारी खासदार विरोधकांशी बोलत असताना तेथून मोदी गेले. तर खाली मान टाकतात. एवढी दहशत आहे. भाजप खासदारांच्या बैठकीत देखील इतरांना मत मांडण्याचा अधिकार नसतो. मोदी येतात बोलतात आणि जातात. ही स्थिती पाहिल्यास मोदींच्या रूपाने रशियाप्रमाणे नवा पुतीन तयार होतोय का, ही चिंता देशातील जनतेला आहे, असे पवार म्हणाले. Sharad Pawar on PM Modi
भाजपचे खासदार मोदींचे हात बळकट करण्यासाठी राज्यघटना बदलण्याची भाषा उघडपणे करत आहेत. राज्यघटना बदलली पाहिजे, अशी इच्छा बाळगणाऱ्यांच्या हाती सत्ता गेल्यास देशाची संसदीय लोकशाही संकटात येईल, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar on PM Modi : माझ्याकडून एक चूक झाली, पवारांनी मागितली अमरावतीकरांची माफी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबावर खासदार झालेल्या आणि यावेळेस भाजपच्या अमरावती लोकसभेत उमेदवार असलेल्या नवनीत राणा यांच्यावर देखील शरद पवार यांनी टीका केली. पवार म्हणाले, आज मी येथे आलो आहे, ते अमरावती करांची माफी मागण्यासाठी. मागच्या वेळेस माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यावेळच्या उमेदवाराला (नवनीत राणा) मतदान करा, हे सांगण्यासाठी मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. त्यांना खासदार केले.
मात्र, पाच वर्षांचा त्यांचा अनुभव पाहिल्यानंतर कधीतरी अमरावतीत यावे आणि अमरावतीकरांना सांगावे की, आमच्याकडून चूक झाली, असे मला वाटत होते. ही चूक पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
हेही वाचा 
SCROLL FOR NEXT