Latest

IPL Ahmedabad Titans : अहमदाबादच्या संघाचे नाव जाहीर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या या हंगामातील दोन नवीन संघांपैकी एक अहमदाबाद (IPL Ahmedabad) आहे. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, संघाचे अधिकृत नावही जाहीर करण्यात आले आहे. 'अहमदाबाद टायटन्स' (IPL Ahmedabad Titans) असे या संघाचे नाव आहे. संघाच्या नावाची घोषणा ट्विटरवर करण्यात आली.

गेल्या वर्षी दोन नवीन संघांची बोली लावण्यात आली होती. अहमदाबाद (Ahmedabad Titans) संघासाठी सीव्हीसी कॅपिटलने हा संघ ५६२५ कोटी रुपयांना विकत घेतला होता. तेव्हापासून संघाचा अधिकृतपणे आयपीएलमध्ये समावेश करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर आता संघाचे नावही जाहीर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी लखनऊ संघाचे नावही जाहीर करण्यात आले होते, ज्याला संजीव गोएंका ग्रुपने ७ हजार कोटींहून अधिक रकमेला विकत घेतले होते. (IPL Ahmedabad Titans)

अहमदाबाद टायटन्सच्या (IPL Ahmedabad Titans) संघात तीन खेळाडूंना घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिले नाव हार्दिक पांड्याचे आहे, जो आतापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. प्रथमच तो मुंबई सोडून दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. हार्दिक पांड्याला संघाचा कर्णधार बनवण्यात आले असून त्याला १५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. या संघातील दुसरा खेळाडू अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान आहे. त्यालाही १५ कोटींमध्ये खरेदी केले गेले आहे. यापूर्वी राशिद खान सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळायचा. अहमदाबाद संघातील तिस-या खेळाडूचे नाव आहे शुबमन गिल. शुबमन गिलला ८ कोटींच्या रकमेसह संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी शुबमन हा अभिनेता शाहरुख खानच्या कोलकाता (केकेआर) संघाकडून खेळत होता.

आयपीएलचा लिलाव यावेळी मोठा असणार आहे. अशा परिस्थितीत सर्व १० संघांचे मालक त्यांच्यासोबत काही मोठ्या नावांचा समावेश करण्याचा प्रयत्न करतील. १२ आणि १३ फेब्रुवारीला होणारा हा लिलाव पाहणे रंजक ठरणार आहे.

IPL 2022 साठी संघांची नावे…

चेन्नई सुपर किंग्स (CSK), मुंबई इंडियन्स (MI), कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RC), सनरायझर्स हैदराबाद (SRH), पंजाब किंग्स (PK), दिल्ली कॅपिटल्स (DC), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि अहमदाबाद टायटन्स (AT) संघ आयपीएल 2022 चा भाग असतील. यूपीचा संघ प्रथमच आयपीएल खेळणार आहे, तर गुजरातचा संघ यापूर्वी आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. गुजरात लायन्स नावाचा आयपीएल संघ होता, जो आता या स्पर्धेचा भाग नाही. गुजरात लायन्सने २०१६ आणि २०१७ मध्ये आयपीएल खेळले होते. (IPL Ahmedabad Titans)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT