Latest

PM Modi : पायाभूत विकास देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी शक्ती – पंतप्रधान

अविनाश सुतार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: देशाच्या भांडवली गुंतवणुकीत, २०१३-१४ च्या तुलनेत पाच पट वाढ झाली असून राष्ट्रीय पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या अंतर्गत, ११० लाख कोटी रुपये गुंतवण्याचे उद्दिष्ट घेऊन,सरकार पुढे वाटचाल करत आहे. पायाभूत विकास देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी शक्ती आहे, असे प्रातिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शनिवारी केले. पंतप्रधानांनी आज "पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक:पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्यासोबत लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारणे" या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या, १२ अर्थसंकल्पोत्तर वेबिनार मालिकेपैकी हे आठवे वेबिनार होते.

यंदाच्या अर्थसंकल्पातून पायाभूत सुविधा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळेल,असा विश्वास व्यक्त करीत पंतप्रधानांनी (PM Modi)  " हा काळ, प्रत्येक भागधारकासाठी,नव्या जबाबदाऱ्या घेण्याचा, नव्या संधी शोधण्याचा आणि धाडसी निर्णय घेण्याचा काळ आहे" असे अधोरेखित केले. कुठल्याही देशाच्या शाश्वत विकासासाठी, पायाभूत सुविधा क्षेत्राला एक महत्वाची भूमिका पार पाडावी लागते.हे क्षेत्र देशाचा विकास करतांनाच भविष्यातील पायाभूत सुविधाही लक्षात घेऊन त्यानुसार काम करते. ज्यांना पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधित इतिहासाचे ज्ञान आहे,त्यांना ही वस्तुस्थिती नक्कीच समजत असेल, असे पंतप्रधान म्हणाले.

पूर्वीच्या सरकारांना देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात गुंतवणूक करताना आलेले अडथळे लक्षात घेऊन गरिबी हे एक वरदान असल्याची प्रचलित मानसिकता पंतप्रधानांनी अधोरेखित केली.सध्याचे सरकार ही मानसिकता केवळ दूर करण्यातच यशस्वी झाले नाही तर आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक करण्यातही यशस्वी ठरले असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम २०१४ च्या पूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाले आहे. त्याचप्रमाणे २०१४ पूर्वी वर्षाला केवळ ६०० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण केले जात होते. ते आता वर्षाला ४००० किलोमीटर पर्यंत पोहोचले आहे. विमानतळांची संख्या आणि बंदराची क्षमता दुप्पट झाली आहे, असे ते म्हणाले.

भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे लक्ष्य साध्य करेल 

"पायाभूत सुविधांचा विकास ही देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देणारी शक्ती आहे".  याचा अवलंब करून भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे लक्ष्य साध्य करेल, असे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.पंतप्रधान गति शक्ती बृहत आराखडा हे आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनाला, विकासासोबत एकत्रित करणारे एक महत्त्वाचे साधन आहे."गती शक्ती राष्ट्रीय बृहत आराखडा भारताच्या पायाभूत सुविधांचा आणि त्याच्या बहुआयामी दळणवळणाचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे असे त्यांनी सांगितले."

यंदाच्या अर्थसंकल्पात १०० महत्वाच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले असून ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्यांची भूमिकेबद्दल पंतप्रधान म्हणाले, ५० वर्षांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्ज योजनेला एक वर्ष मुदतवाढ दिली आहे.त्यासाठीचा अर्थसंकल्पीय खर्च ३० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

भारताच्या भौतिक पायाभूत सुविधांची मजबूती महत्त्वाची

देशातील सामाजिक पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी भारताच्या भौतिक पायाभूत सुविधांची मजबूती तितकीच महत्त्वाची आहे. मजबूत सामाजिक पायाभूत सुविधामुंळे अधिक प्रतिभावान आणि कुशल तरुण घडतील जे देशसेवेसाठी पुढे येतील, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास, प्रकल्प व्यवस्थापन, आर्थिक कौशल्ये आणि उद्योजकता यावर पंतप्रधानांनी भर दिला. विविध क्षेत्रातील लहान आणि मोठ्या उद्योगांना मदत होईल आणि देशातील मनुष्यबळालाही फायदा होईल, अशा कौशल्यांची गरज हुडकण्याची यंत्रणा विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

सरकारमधील विविध मंत्रालयांनी या दिशेने वेगाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. पायाभूत सुविधांचा विकास हा आता केवळ रेल्वे, रस्ते, बंदरे आणि विमानतळांपुरता मर्यादित राहिलेला नाही. शेतकऱ्यांची उत्पादने साठवण्यासाठी खेड्यापाड्यात मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. शहरे आणि खेड्यापाड्यात विकसित होत असलेली आरोग्य संवर्धक केन्द्र (वेलनेस सेंटर्स), नवीन रेल्वे स्थानके आणि पक्की घरे वितरीत केली जात आहेत. याची उदाहरणे त्यांनी दिली. सर्व भागधारकांची मते, सूचना आणि अनुभव या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या जलद आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी मदत करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT