Latest

कांजिण्या संसर्गजन्य आजार; बचाव आणि उपाय

अनुराधा कोरवी

व्हेरिसेला या नावाने ओळखला जाणारा कांजिण्या हा एक विषाणू असून तो लहान मुलांवर हल्ला करतो. यामुळे शरीरावर सर्वत्र खाज सुटणारे, लाल पुरळ उठतात. कांजिण्या हा एक संसर्गजन्य आजार असून रुग्णाच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तीला तो होऊ शकतो. त्याच्यावर लसीकरण हा उत्तम उपाय आहे.

संबंधित बातम्या  

मुलांना कांजिण्या येणे हा एक सामान्य आजार आहे. यामध्ये दोन-तीन दिवस किरकोळ ताप आल्यानंतर मसुराइतके बारीक फोड येतात. सुरुवातीला छाती, पोट, पाठीवर हे फोड येतात. नंतर ते चेहरा आणि हाता-पायांवरही दिसू लागतात. हळूहळू या फोडांमध्ये पाणी होऊ लागते आणि ते फुटून सुकू लागतात. त्यावर पापुद्रे धरतात आणि हळूहळू ते निघून जातात आणि त्याठिकाणी हलकासा डाग राहतो. नवीन फोड दोन-तीन दिवसांपर्यंत येतात. छोट्या मुलांमध्ये काही फोडच येतात. पण, मोठ्या माणसांमध्ये जास्त फोड येतात आणि आजार गंभीर रूप धारण करतो.

कांजिण्या हा एक संसर्गजन्य आजार आहे. रुग्णाचा खोकला आणि त्याच्या फोडांमुळे या आजाराचे संक्रमण वाढते. रुग्णाच्या संपर्कात येणार्‍या लोकांना 14 दिवसांमध्ये कांजिण्या होतात. शरीर कांजिण्यांच्या विरोधात प्रतिरोधक शक्ती बनवून या आजारातून सुटका करते. एकदा अशा प्रकारचा आजार झाल्यानंतर त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आयुष्यभर राहते. त्यामुळेच हा आजार दुसर्‍यांदा होत नाही. लहानपणीच कांजिण्या आल्या असतील तर त्यानंतर त्याचा धोका शक्यतो नसतो. लहानपणी हा आजार झाला नसेल, तर वयाच्या 10 व्या वर्षानंतर हा आजार होऊ शकतो.

पूर्वी देवी हा एक धोकादायक आजार होता आणि त्याचे डाग आयुष्यभर राहत असत. प्रभावी लसीकरणामुळे हा आजार संपुष्टात आला आहे. कांजिण्या हा मुलांचा सामान्य आजार आहे आणि त्यामुळे जीवाला धोका नसतो. त्यासाठी त्याचे लसीकरण अत्यावश्यक नाही.

वयाच्या 15 महिन्यांनंतर केव्हाही लसीकरण करता येते. लसीकरणामुळे पूर्णपणे सुरक्षा मिळते. पण, कधीकधी लसीकरणानंतरही कांजिण्या होऊ शकतात. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यामुळे अशा प्रकारचा आजार होऊ शकतो. जे लोक दाट लोकवस्तीमध्ये राहतात त्यांना अशा प्रकारची समस्या भेडसावते.

लसीकरणानंतर ही समस्या उद्भवल्यास शरीरावर कमी फोड येतात आणि आजार वाढत नाही. यापासून बचाव करण्यासाठी कमिटी ऑफ इम्युनायझेशनने कांजिण्यांचे दुसरे लसीकरण पाच वर्षांच्या वयामध्ये करून घेण्याचा सल्ला दिला आहे.

खरे पाहता, 1990 च्या मध्यात कांजिण्यांची लस विकसित झाल्यापासून रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कारण, या लसीमुळे 90 टक्के बालकांचं कांजिण्यांपासून रक्षण केलं जातं. यासाठी बाळाच्या 12 ते 15 महिने वयादरम्यान लस देणं गरजेचं आहे. दुसरा प्रायमरी डोस बालकाच्या 4 ते 6 वर्षे वयामध्ये दिला जातो. ज्या बालकांना व प्रौढांना लस मिळाली नाही वा कांजिण्या होऊन गेल्या आहेत, त्यांना कॅच-अप डोस घेता येतो. वयस्कर रुग्णांमध्ये कांजिण्या अधिक तीव्र होत जातात. ज्या पालकांनी आधी लस घेतलेली नाही, त्यांना नंतर घेता येते.

SCROLL FOR NEXT