Latest

IND vs BAN Asian Games 2023 | क्रिकेटमध्ये भारताचे पदक निश्चित, बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव करत फायनलमध्ये धडक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारतीय पुरुष क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये भारताचे आणखी पदक निश्चित झाले आहे. फिरकीपटू साई किशोरची भेदक गोलंदाजी तसेच ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने आज शुक्रवारी बांगलादेशचा ९ गडी राखून पराभव केला. या विजयाने हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. (IND vs BAN Asian Games 2023)

संबंधित बातम्या 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी बांगलादेशी फलंदाजांना नामोहरम केले. पॉवरप्ले संपला तेव्हा बांगलादेशची अवस्था ६ षटकांत ३ बाद २१ धावा अशी होती.

साई किशोर, वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत बांगलादेशचा डाव १० षटकांत ४ बाद ४० वर आणला. बांगलादेशकडून पावेज हुसैन इमॉनने ३२ चेंडूंत २३ धावा केल्या. (Hangzhou Asian Games)

बांगलादेशच्या विकेट पडत राहिल्या. पण यष्टिरक्षक आणि फलंदाज जाकेर अली २९ चेंडूत २४ धावा आणि रकीबुल हसन याने केलेल्या १४ धावांच्या जोरावर बांगलादेशला २० षटकांत ९ गडी गमावून ९६ धावांपर्यंत मजल मारता आली.

भारताच्या साई किशोरने १२ धावांत ३ विकेट घेतल्या. वॉशिंग्टनेही २ विकेट घेत चांगली गोलंदाजी केली. तिलक, अर्शदीप सिंग, शाहबाज अहमद आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक विकेट घेतली. (IND vs BAN Asian Games 2023)

नेपाळविरुद्धच्या मागील सामन्यात शतक झळकावल्यानंतर ९७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला शून्यावर बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार गायकवाड आणि तिलक वर्मा यांनी भारतासाठी वेगाने धावा कुटण्यास सुरुवात केली आणि ६ षटकांत १ बाद ६८ धावा अशी मजल मारली. (Asian Games Mens T20I 2023)

ऋतुराज गायकवाडने २६ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ४० धावा आणि तिलक वर्माने २६ चेंडूंत २ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ५५ धावा करत भारताने ९७ धावांचे लक्ष्य अवघ्या ९.२ षटकांत पार केले.

या विजयाने भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. ७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुवर्णपदकाच्या लढतीत भारताचा सामना अफगाणिस्तान अथवा पाकिस्तानशी होईल.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT