Latest

Sri Lanka Women vs India Women 2nd ODI : भारतीय महिला संघाने श्रीलंकेला १० गडी राखून चारली धूळ

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला संघाने गोलंदाजी व फलंदाजीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत दबदबा ठेवत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेच्या संघाला १० विकेटने मात देत एकदिवसीय मालिकेत २-० (Sri Lanka Women vs India Women 2nd ODI) अशी बढत घेतली. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी करत नाबाद १७४ धावांची भागिदारी रचली. या खेळीच्या बळावर भारताने २५.४ षटकातच श्रीलंकेने दिलेले आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.

या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने ८४ चेंडूत नाबाद ९४ धावा तर शेफाली वर्मा (Shafali Verma) हिने ७१ चेंडत ७१ धावा बनवल्या. या खेळीने दोघींनी देखिल आपल्या टीकाकारांना जोरदार उत्तर दिले आहे. या आधी या सलामी जोडीवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी होत नसल्यामुळे टीका केली जात होती. (Sri Lanka Women vs India Women 2nd ODI)

सुरुवातीला भारतीय महिला संघाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाला ५० षटकांमध्ये १७३ धावांत रोखत एक प्रकारे तेथेच विजयाची पायभरणी केली. जलद गोलंदाज रेणुका सिंह हिने २८ धावा देत ४ बळी मिळवले. तर दीप्ती शर्मा (Dipti Sharma) हिने ३० धावा देत २ बळी मिळवले. या शिवाय मेघना सिंह हि सुद्धा ४३ धावा देत २ विकेट घेण्यात यशस्वी झाली.

स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी रचलेली मजबूत भागिदारी श्रीलंके विरुद्धची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ भागिदारी ठरली आहे. पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यांनंतर भारतीय संघ विजयाच्या दृढ निश्चियाने मैदानात उतरला होता. नाणेफक जिंकत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने गोलंदाजीच अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर श्रीलंकेला फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले. (Sri Lanka Women vs India Women 2nd ODI)

श्रीलंकेचा संघ खेळाच्या सुरुवातीपासूनच अडचणीत सापडल्याचे पहायला मिळाले. गोलंदाज रेणुका सिंह (Renuka Singh) हिने अचुक ठिकाणी गोलंदाजीचा टप्पा ठेवत आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी या सामन्यात नोंदवली. रेणुकाने पहिले तीन फलंदाज बाद करत श्रीलंकेच्या संघाचे एकप्रकारे कंबरडेच मोडले. यानंतर आलेली फलंदाज अमा कंचना हिने ८३ चेंडूत ४७ धावांची खेळी करत संघाला १५० पार पोहचविण्यात बहुमोल योगदान दिले. अनुभवी गोलंदाज दीप्ती हिने शेवटच्या दोन चेंडूवर दोन बळी घेत श्रीलंकेचा खेळच संपवला.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) सामन्यानंतर म्हणाली, "आम्हाला मोठ्या भागिदारीची आवश्यकता होती. आम्ही ठरवले होते की या सामन्यात शंभर टक्के योगदान देणे गरजेचे आहे. ते आम्ही साध्य करु शकलो. गोलंदाजीमध्ये पर्याय असणे ही अत्यंत चांगली गोष्ट असते. भारतीय संघाने पहिला सामना चार विकेटने जिंकला होता. आता आम्ही गुरुवारचा शेवटचा सामना जिंकत या मालिकेत निर्भेळ यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करु."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT