INDvsENG : भारताचे इंग्लंडसमोर 378 धावांचे लक्ष्य! | पुढारी

INDvsENG : भारताचे इंग्लंडसमोर 378 धावांचे लक्ष्य!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने दुसऱ्या डावात 245 धावा केल्या आणि इंग्लंडला 378 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 66 धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 8 चौकार आले.

स्टुअर्ट ब्रॉडने पुजाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चेतेश्वरला ब्रॉडचा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळायचा होता, पण तिथेच उभ्या असलेल्या अॅलेक्स लीसने सोपा झेल घेतला. त्याचवेळी पहिल्या डावात 146 धावा करणाऱ्या ऋषभने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. तो 86 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दहावे अर्धशतक होते. त्याला जॅक लीचने आपला बळी बनवले. या दोघांशिवाय इतर फलंदाजांनी निराशा केली. शुभमन गिल 4, हनुमा विहारी 11, विराट कोहली 20, श्रेयस अय्यर 19, रवींद्र जडेजा 23, शार्दुल ठाकूर 4, मोहम्मद शमी 13 तर कर्णधार जसप्रीत बुमराह 7 धावा करून बाद झाला. मोहम्मद सिराज दोन धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅटी पॉट्सने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर 250+ धावांचे लक्ष्य फक्त एकदाच गाठण्यात यश आले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 14 वर्षांपूर्वी 2008 मध्ये हा पराक्रम केला होता. त्यांनी चौथ्या डावात 283 धावा केल्या आणि 5 गडी राखून सामना जिंकला होता.

अशा परिस्थितीत बुमराहच्या सेनेला हा कसोटी सामना आणि मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. टीम इंडियाने 2007 मध्ये ब्रिटिशांना त्यांच्या भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत केले होते. सध्या टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे त्यावेळी संघाचे कर्णधार होते.

Back to top button