Latest

INDvsAUS T20 Series : डेव्हिड वॉर्नर भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून ‘आऊट’, कारण…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsAUS T20 Series : टीम इंडियाविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 15 सदस्यीय संघात बदल केला आहे. संघाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर तो आता इतर वरिष्ठ खेळाडूंसह मायदेशी परतणार असून पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करणार आहे. याआधी त्याला टी-20 मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले होते, मात्र आता अष्टपैलू अॅरॉन हार्डी त्याची जागा घेणार आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी

आयसीसी वनडे विश्वचषक संपल्यानंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 23 नोव्हेंबरला मालिकेतील पहिला सामना आहे. टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. भारतानेही संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा संघाची निवड केली आहे. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघातील बदलाची घोषणा केली. त्यांनी वॉर्नरला टी-20 मालिकेतून वगळल्याचे जाहीर केले. तो डिसेंबर-जानेवारीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी मायदेशी परतेल. त्याच्यासह विश्वचषक विजेत्या संघातून वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन आणि मिचेल मार्श यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. हार्डीशिवाय वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनलाही संघात स्थान देण्यात आले आहे. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने त्रस्त वेगवान गोलंदाज स्पेंसन जॉन्सनची जागी घेईल,' असेही स्पष्ट केले. (IND vs AUS T20 Series)

वॉर्नर घेणार निवृत्ती?

वॉर्नरने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासाठी 48.63 च्या सरासरीने 535 धावा केल्या. आगामी पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ही त्याची शेवटची कसोटी मालिका असू शकते. त्यामुळे तो सिडनीतील त्याच्या घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळून या फॉरमॅटला अलविदा करेल अशी चर्चा आहे.

मॅथ्यू वेड कांगारूंचा कर्णधार (INDvsAUS T20 Series)

भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेचे नेतृत्व यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड करणार आहे. या संघात विश्वचषक विजेत्या संघातील सात खेळाडू आहेत. यात शॉन अॅबॉट, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झम्पा यांचा समावेश आहे. (IND vs AUS T20 Series)

टीम इंडियाची घोषणा

दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही भारताने सोमवारी संघाची घोषणा केली. ज्यामध्ये विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या केवळ तीन सदस्यांना स्थान मिळाले आहे. यात कर्णधार सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघातील आणखी एक सदस्य श्रेयस अय्यर रायपूर आणि बंगळुरू येथे होणाऱ्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात सामील होणार आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडला पहिल्या तीन टी-20 सामन्यांसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तर, अय्यर शेवटच्या दोन टी-20 सामन्यांसाठी उपकर्णधार असेल. या मालिकेसाठी टीम इंडियाने कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह संघातील बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. (IND vs AUS T20 Series)

भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

ऑस्ट्रेलियाचा संघ :

मॅथ्यू वेड (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, टीम डेव्हिड, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅरॉन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, जोश इंग्लिस, तन्वीर संघा, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, स्पेन्सर जॉन्सन, अॅडम झाम्पा.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक (INDvsAUS T20 Series)

पहिला टी-20 सामना : विशाखापट्टणम (23 नोव्हेंबर)
दुसरा टी-20 सामना : तिरुवनंतपुरम (26 नोव्हेंबर)
तिसरा टी-20 सामना : गुवाहाटी (28 नोव्हेंबर)
चौथा टी-20 सामना : रायपूर (1 डिसेंबर)
पाचवा टी-20 सामना : बंगळूर (3 डिसेंबर)

टीम इंडियाचा द. आफ्रिका दौरा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला प्रथम 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळावे लागतील. या दौऱ्याची सुरुवात यावर्षी 10 डिसेंबर रोजी डर्बन टी-20 सामन्याने होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT