Latest

India vs Australia 3 ODI : कांगारूंचे भारतासमोर 353 धावांचे आव्हान

सोनाली जाधव

राजकोट; वृत्तसंस्था : मिशेल मार्शचा 96 धावांचा झंझावात आणि मार्नस लाबुशेनच्या 72 धावांच्या धडाकेबाज खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध तिसर्‍या व शेवटच्या वन-डे लढतीत 7 बाद 352 धावांचा डोंगर रचला. ऑस्ट्रेलियातर्फे या लढतीत एकूण चार अर्धशतके झळकावली गेली. डेव्हिड वॉर्नरने 34 चेंडूंत 56 धावा फटकावल्या, तर स्टिव्ह स्मिथनेदेखील खराब फॉर्ममधून बाहेर पडत 74 धावांची शानदार खेळी साकारली. मिशेल मार्शचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले असले, तरी त्याच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलिया धावांचा डोंगर रचणार, हे निश्चित झाले.

'आयसीसी' वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या उंबरठ्यावर चार फलंदाजांनी शानदार अर्धशतके झळकावल्याने 'ऑस्ट्रेलियन थिंक टँक'साठीदेखील हा मोठा दिलासा ठरला. वॉर्नरने उत्तम फटकेबाजी केली असली, तरी चुकीच्या फटक्यामुळे त्याची खेळी संपुष्टात आली. स्टिव्ह स्मिथनेदेखील शानदार अर्धशतक साजरे केले. शिवाय, डावाच्या उत्तरार्धात लाबुशेनची 58 चेंडूंतील 72 धावांची अर्धशतकी खेळी लक्षवेधी ठरली. लाबुशेन यादरम्यान सध्या सुरू असलेल्या कॅलेंडर वर्षात ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज ठरला.

मार्शने विशेषत: जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा बराच समाचार घेतला. यामुळे बुमराहला 10 षटकांत 3 बळींसाठी 81 धावा मोजाव्या लागल्या. मार्शने बुमराहला 2 चौकार व एक षटकार फटकावला. प्रारंभी चेंडू फारसा वळत नसल्याने ऑस्ट्रेलियाने याचा पुरेपूर लाभ घेतला. प्रारंभी सावध पवित्र्यावर भर देणार्‍या वॉर्नरनेदेखील नंतर सिराजला सलग दोन षटकार खेचत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले.
नंतर वॉर्नरने प्रसिद्ध कृष्णालादेखील 3 चौकार व एका षटकारासाठी फटकावत आणखी जोरदार आक्रमण चढवले. त्याने सिराजला

फाईन लेगवरून षटकार खेचत भारताविरुद्ध आपले नववे अर्धशतक साजरे केले. त्याचे हे कारकिर्दीतील 31 वे अर्धशतक होते. मात्र, नंतर तो प्रसिद्धला स्कूप करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर स्मिथ व मार्श यांनी चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर सातत्याने दडपण ठेवले.

बुमराहला 23 व्या षटकात परत चेंडू सोपवण्यात आला; पण मार्शने 3 चौकार व 2 षटकारांसह 19 धावांची आतषबाजी केली. त्यानंतर पुन्हा एकदा कुलदीपला परत आणणे भाग होते. कुलदीपचे या सामन्यातील पृथक्करण 48 धावांत 2 बळी, असे राहिले. मार्श व स्मिथ यांनी यादरम्यान दुसर्‍या गड्यासाठी 119 चेंडूंत 137 धावांची भागीदारी साकारली.

मार्श या वर्षात दुसर्‍यांदा शतकासमीप पोहोचला होता; पण येथेही त्याची संधी हुकली. त्याने कुलदीपच्या गोलंदाजीवर कव्हरवरील कृष्णाकडे सोपा झेल दिला. स्मिथने 61 चेंडूंत 74 धावा केल्या. त्याची खेळी सिराजने संपुष्टात आणली. लाबुशेन व कमिन्स यांनी 46 धावांची भागीदारी साकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने वन-डे क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध चौथी सर्वोच्च धावसंख्या साकारली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT