पुढारी ऑनलाईन: जगातील बहुतेक लसी कोरोनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग रोखण्यास असमर्थ ठरू शकतात. एका प्राथमिक संशोधनाच्या आधारे हे समोर आले आहे. भारतात, लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना देखील ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका आहे. तथापि, चांगली गोष्ट अशी आहे की, ज्या लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे त्यांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग होण्याची शक्यता फारच कमी आहे. संसर्ग झालेल्या लोकांमध्ये सामान्य लक्षणे दिसून येतील.
ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीच्या क्षमतेवर हा अभ्यास ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन प्रकाराचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. मात्र, यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल. या दोन्ही लसी जगातील बहुतांश देशांमध्ये उपलब्ध नाहीत.
भारतासंदर्भात या अभ्यासात असे म्हटले आहे की, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीने सहा महिन्यांच्या लसीकरणानंतर ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्याची कोणतीही क्षमता दर्शविली नाही. भारतात, लसीकरण केलेल्या 90 टक्के लोकांना लस ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका या ब्रँड नावाखाली मिळाली आहे. या लसीचे साडे सहा कोटींपेक्षा अधिक डोस 44 आफ्रिकन देशांमध्ये देखील वितरित केले गेले आहेत. प्राथमिक संशोधनानुसार, जॉन्सन अँड जॉन्सन, रशिया आणि चीनमध्ये बनवलेल्या लसी देखील ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी कुचकामी किंवा खूपच कमी सक्षम असल्याचे आढळले आहे. जगातील बहुतेक देशांचे लसीकरण कार्यक्रम या लसींवर आधारित असल्याने, महामारीच्या नवीन लाटेचा प्रभाव हा व्यापक असू शकतो.
जगातील अब्जावधी लोकांचे अद्यापही लसीकरण करण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका वाढल्याने नवीन प्रकार उदयास येण्याचा धोका वाढतो. हे संशोधन प्रामुख्याने प्रयोगशाळेतील परिणामांवर आधारित आहे, जे मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीची पूर्ण दखल घेत नाहीत. हे संशोधन जगातील लोकांवर होणाऱ्या परिणामांवर आधारित नाही, पण तरीही त्याचे परिणाम अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
लस घेतल्यानंतर शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज विषाणूंविरूद्ध प्रथम प्रतिकार निर्माण करतात, तसेच लस शरीरातील टी पेशींना देखील सक्रिय करते. प्राथमिक संशोधनात असे दिसून आले आहे की, या 'टी' पेशी ओमायक्रॉन व्हेरियंट ओळखण्यास सक्षम आहेत. यामुळे गंभीर प्रकारचा संसर्ग होणार नाही. न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिसिनमधील विषाणू विशेषज्ञ जॉन मूर यांच्या मते, तुम्हाला सौम्य लक्षणांनी संसर्ग होऊ शकतो. आणखी एक चांगली गोष्ट आहे की आतापर्यंत ओमायक्रॉन प्रकार डेल्टापेक्षा कमी प्राणघातक दिसत आहे. सेंटर फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिक स्टडीजचे जागतिक आरोग्य धोरण संचालक जे. स्टीफन मॉरिसन म्हणाले की, हा आजार गंभीर नसला तरी ओमायक्रॉनमुळे जगावर काही बंधने येतील.
आशा आहे की, भारत सुरक्षित राहील
दिल्लीत सार्वजनिक आरोग्य संशोधक म्हणून काम करणारे रामनन लक्ष्मीनारायणन म्हणतात की, ओमायक्रॉन संसर्ग भारतात वेगाने वाढेल, परंतु लसीकरणामुळे आणि पूर्वी मोठ्या संख्येने संसर्ग झालेले भारतीय सुरक्षित राहतील अशी आशा आहे. लक्ष्मीनारायण म्हणाले की, भारतात सरकार बूस्टर डोसचा विचार करत आहे, परंतु डेल्टा व्हेरियंटपासून अजूनही खूप धोका आहे. सरकार उर्वरित लोकसंख्येला लसीकरण करण्याच्या गोष्टीवर विचार करत आहे. यामध्ये प्रत्येकाला दोन डोस, वृद्धांना आणि उच्च धोका असलेल्यांना बूस्टर डोस देणे या गोष्टींचा समावेश आहे.
म्हणूनच फायझर आणि मॉडर्ना प्रभावी
फायझर आणि मॉडर्नाच्या लसी प्रभावी असण्याचे कारण म्हणजे दोन्ही एमआरएनए (संक्रमण रोखण्यासाठी लस बनवण्याची पद्धत) तंत्रज्ञानावर आधारित आहेत. या तंत्रज्ञानाने बनवलेल्या लसीने कोरोनाच्या सर्व प्रकारांच्या संसर्गाविरूद्ध चांगली प्रतिकारशक्ती दाखवली आहे. इतर सर्व लसी रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या जुन्या पद्धतींवर आधारित आहेत. चीनमध्ये बनवलेल्या लसी, सिनोफार्म आणि सायनोव्हॅक या नवीन प्रकाराचा संसर्ग रोखण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत. या दोन लसी जगात पुरवल्या जाणाऱ्या लसींपैकी जवळपास निम्म्या आहेत. संशोधकांच्या मते, रशियाची स्पुतनिक लस देखील ओमायक्रॉन संसर्गाविरूद्ध जवळजवळ प्रभावहीन ठरेल.
आपण तयार असले पाहिजे: गुलेरिया
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी रविवारी सांगितले की, युनायटेड किंगडममध्ये ओमायक्रॉन वाढती प्रकरणे पाहता भारताने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहायला हवे. ते म्हणाले की, युनायटेड किंगडम प्रमाणे येथील परिस्थिती भयावह नसेल अशी आशा बाळगायला हवी. आम्हाला ओमायक्रॉनवर औरा डेटा हवा आहे. जगात जिथे जिथे केसेस वाढतात तिथे तिथे अभ्यास करायला हवा आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असायला हवे.