Latest

Womens Asia Cup : अवघ्या 6 ओव्हर्समध्ये भारताने थायलंडला चिरडले, ‘फायनल’चा मार्ग सोपा!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Womens Asia Cup : भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषक 2022 मध्ये आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. आज (दि. 10) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने थायलंडचा 84 चेंडू आणि 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाचा आशिया कपच्या फायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग सोपा झाला आहे. आशिया चषकमधील सहा सामन्यांमधला भारतीय संघाचा हा पाचवा विजय आहे. संघाचे आता 10 गुण झाले असून त्यांनी आता उपांत्य फेरी गाठली आहे.

बांगलादेशच्या सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाची कर्णधार स्मृती मानधना हिचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. थायलंडचे दोन्ही सलामीवीर (INDW vs THIW) अनुक्रमे 12 आणि 6 धावा करून बाद झाले. यानंतर कर्णधार नरुमोल चावईही 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. चौथ्या क्रमांकावर असलेला चनिदा सुथिरुआंग पहिल्याच चेंडूवर स्नेह राणाची बळी ठरली. सोर्निनिन टिपोच, फनिता माया आणि रोझनान कानोह यापैकी कोणीही खेळपट्टीवर टीकाव धरू शकले नाही. नानपट कोंचानरियोनकायने हिने थायलंडच्या डावातील सर्वाधिक 12 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यांचा संपूर्ण संघ 15.1 षटकांत केवळ 37 धावांच करू शकला. त्यानंतर विजयासाठी आवश्यक लक्ष्य भारतीय फलंदाजांनी अवघ्या 6 षटकांत एक गडी गमावून गाठले. भारतासाठी एस मेघनाने 18 चेंडूत तीन चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या आणि पूजा वस्त्राकरने 12 चेंडूत 2 चौकार मारून तेवढ्याच धावा केल्या. शेफाली वर्माने 8 धावांचे योगदान दिले. भारतीय कर्णधार स्मृती मानधना हिचा हा 100 वा टी 20 सामना होता. (Womens Asia Cup IND vs THAI)

भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर सर्व गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. स्नेह राणा ही सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 4 षटकात केवळ 9 धावा देऊन 3 बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मेघना सिंगने एक बळी घेत थायलंडचा डाव संपुष्टात आणला. (Womens Asia Cup IND vs THAI)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT