Latest

India Canada Issue: कॅनडाचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित : परराष्ट्र मंत्रालय

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडामधील खलिस्तानी समर्थक हरदिपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. यानंतर दाेन्‍ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी कॅनडाच्या आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (India Canada Issue)

खलिस्तानी समर्थक हरदिपसिंग निज्जर याच्या हत्येशी कॅनडा सरकारने भारताचा संबंध लावला. यावर भारताने सडेतोड उत्तर देत, कॅनडाच्या भारतातील मुत्सद्दी अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश दिले. यानंतर भारत सरकारने कॅनडाच्या नागरिकांचा व्हिसा अनिश्चित काळासाठी रोखण्याचे आदेश दिले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली.

खलिस्तानशी संबंधित पुरावे कॅनडाला अनेकवेळा दिले

माध्यमांशी बोलताना बागची म्हणाले, या प्रकरणात काही प्रमाणात पक्षपात झाला आहे. कॅनडाचे अधिक राजनैतिक अधिकारी आमच्याकडे अधिक आहेत. याच्या तुलनेत आमचे कॅनडातील भारतीय अधिकारी हे कमी आहेत. येत्या काही दिवसात दूतवासातील कॅनडाचे अधिक कर्मचारी कमी होतील. आम्ही खलिस्तानशी संबंधित पुरावे कॅनडाला अनेकवेळा दिले आहेत, परंतु आवश्यक कारवाई केली नाही, असेही बागची यांनी स्पष्ट केले आहे. (India Canada Issue)

India Canada Issue: कॅनडामधील भारतीय व्हिसा सेवा निलंबित

दोन देशातील या तणावपूर्ण वातावरणामुळे भारताने कॅनडात भारतीय व्हिसा सेवा निलंबित केली आहे. आता कॅनेडियन नागरिकांना व्हिसा सेवेचा लाभ घेता येणार नाही, म्हणजेच ते भारतात येऊ शकणार नाहीत. यावर अरिंदम बागची म्हणाले की, पुढील आदेश येईपर्यंत व्हिसा सेवा स्थगित राहतील. कॅनडाचे नागरिक सध्या भारतात येऊ शकणार नाहीत."

जस्टिन ट्रुडो यांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित : बागची

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत, असे म्हणत ट्रुडो यांचे विधान राजकीय हेतूने प्रेरित आहेत असा आरोप परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी केला आहे. बागची म्हणाले, "या सगळ्याच्या विरोधात भारताने कॅनडाकडे अनेक लेखी कागदपत्रे सादर केली आहेत. असे असतानाही तेथे आश्रय घेणाऱ्या खलिस्तानींवर कॅनडा सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे ट्रुडो यांचे विधान राजकीय हेतूने प्रेरित आहे."

कॅनडातील भारताच्या सुरक्षेसंबंधी औपचारिक चर्चा करणे योग्य नाही

कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावासात सुरक्षा वाढण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, "सुरक्षा पुरवणे ही यजमान सरकारची जबाबदारी आहे, असे आमचे मत आहे. काही ठिकाणी आमची स्वतःची सुरक्षा व्यवस्था देखील आहे. पण यावर कोणतीही सार्वजनिक टिप्पणी करता येणार नाही." सुरक्षेसंबंधी औपचारिक चर्चा करणे योग्य नाही. यासाठी ही योग्य परिस्थिती नाही, असेही अरिंदम बागची म्हणाले.

कॅनडाकडून कोणतीही विशिष्ट माहिती प्राप्त झाली नाही

भारत-कॅनडा वादावर बागची म्हणाले की, आम्ही प्रदान केलेल्या कोणत्याही विशिष्ट माहितीकडे लक्ष देण्यास तयार आहोत, परंतु अद्याप आम्हाला कॅनडाकडून कोणतीही विशिष्ट माहिती मिळालेली नाही. आमच्या बाजूने, कॅनडामध्ये राहणार्‍या काही लोकांच्या गुन्हेगारी कृतींसंबंधीचे विशिष्ट पुरावे कॅनडासोबत सामायिक केले गेले आहेत, परंतु त्यावर कॅनडाकडून कोणतीही प्रक्रिया देण्यात आलेली नाही.

हेही वाचा:
SCROLL FOR NEXT