Latest

Pakistan food crisis | पाकिस्तानात अन्नसंकट! भारत करु शकतो गहू पुरवठा : RSS सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. तिथली महागाई ३० टक्क्यांजवळ पोहोचली आहे. गव्ह्याच्या पिठाचा दर प्रति किलो २५० रुपयांवर (Pakistan food crisis) पोहोचला आहे. अशा परिस्थितीत भारत पाकिस्तानला गव्हाचा पुरवठा करु शकतो, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) (RSS) सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल (RSS joint general secretary Krishna Gopal) यांनी केले आहे. चित्रपट निर्माते इक्बाल दुर्रानी यांनी सामवेदाचा पर्शियन भाषेत अनुवाद केला असून याबाबत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. दिल्लीतील सैनिक फार्ममध्ये झालेल्या कार्यक्रमाला संघाचे नेते इंद्रेश कुमारही उपस्थित होते.

"पाकिस्तानमधील लोकांचा जगण्यासाठी दररोज संघर्ष सुरु आहे. पण आम्हाला वाटते की त्यांनीही आनंदाने जगले पाहिजे. पाकिस्तानात गहू २५० रुपये किलो दराने विकला जात आहे याचे आम्हाला वाईट वाटते. भारत पाकिस्तानला २५ ते ५० लाख टन गहू देऊ शकतो. पण ते भारताकडे मदत मागत नाहीत. भारताकडे अतिरिक्त गहू आहे. भारत अतिरिक्त गहू साठा पाकिस्तानला (Pakistan food crisis) पाठवू शकतो. ७० वर्षांपूर्वी ते आमच्यासोबत होते. पाकिस्तानने भारताशी चार वेळा युद्ध केले आहे. त्यांनी १९४८, १९६५, १९७१ आणि कारगिल असे आक्रमण केले. असे असतानाही भारतीयांच्या मनात हे असले पाहिजे की आपण संकटाच्या काळात पाकिस्तानला गव्हाचा पुरवठा करावा," असे कृष्ण गोपाल यांनी कार्यक्रमात संबोधित करताना म्हटले.

पाकिस्तानने भारताकडे गह्वाची मागणी केली तर भारत सरकार त्यावर विचार करेल. पण पाकिस्तान तशी मागणी करत नाही. पाकिस्तानने त्याच्या स्वभावात सुधारणा करावी. त्यांच्या कृतीमुळेच तेथे अस्थिरता निर्माण झाली आहे. पाकिस्तानची निर्मिती शस्त्रांच्या आधारावरच झाली आहे. पाकिस्तानात सध्या बिकट परिस्थिती आहे. पण भारतात मुस्लिम चांगल्या पद्धतीने आयुष्य जगत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

कृष्ण गोपाल पुढे म्हणाले की, सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजेच सर्वांनी आनंदी राहावे यावर आमचा विश्वास आहे. "जगात खूप असहिष्णूता आहे. महिन्याभरापूर्वीच पाकिस्तानातील एका मशिदीत बॉम्बस्फोट झाला आणि त्यात शंभर लोक मरण पावले. हे आश्चर्यकारक आहे की ज्यांनी मारले आणि जे मरण पावले हे दोघेही कुराण मानणारे होते. भांडण कशावरून होतं? अफगाणिस्तान आणि सीरियातील संघर्षाचा मुद्दा काय आहे. संपूर्ण जगच असहिष्णू बनले आहे," असेही ते पुढे म्हणाले.

अहमदिया समुदायाला पाकिस्तानात नाही, पण भारतात समान अधिकार

कृष्ण गोपाल पुढे म्हणाले की, भारतात विविधतेत एकता आहे आणि देशात सर्व संप्रदाय आणि धर्म शांततेत रहात आहेत. "इस्लाममध्ये ७३ संप्रदाय आहेत आणि भारताशिवाय असा कोणताही देश नाही जिथे हे सर्व आहे आणि सर्वांना समान अधिकार आहेत. अहमदिया समुदायाला पाकिस्तानमध्ये कोणताही अधिकार नाही, पण भारतात त्यांना समान अधिकार आहेत."

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT